पहिली मंगळागौर..
काय सख्यांनो आठवते का आपली पहिली मंगळागौर ?
आपल्या मराठी संस्कृतीतील अतिशय सुंदर अशी ही मंगळागौरीची परंपरा..! मला आठवते न माझी पहिली मंगळागौर! खुप उत्साहात साजरी होणारी ही मंगळागौर..! अगदी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना चिडवून, थट्टा करून, नवीन नवरी तर लाजून चुर होते.म्हणजे हा माझा अनुभव बरं! एकतर नवीन घरात प्रवेश केलेला असतो. सगळे काही नवीन,कुणाशी फारशी ओळख झालेली नसते,आणि आपण मात्र सगळ्यांच्या फोकसमध्ये असतो.
श्रावण महिन्यातील हा पहिला पवित्र दिवस, व सणावाराला झालेली सुरूवात !! पावसाने चिंब झालेली हिरवीगार सृष्टी, धरणीमातेने जणु हिरवी शाल पांघरली आहे ,विविध फुलांचा आलेला बहर, किती सुंदर रंगबेरंगी फुले, पाने, अहाहा..! नटलेल्या सृष्टीला बघूनच ही मंगळागौरीच्या संकल्पना सुचली असावी. मंगळागौरीची लगबग अगदी महिनाभर आधीच सुरू होते. नवीन लग्न झालेल जोडपं आणि पाच सुवासिनी ज्यांची लग्नाला पाच वर्षे झालेली आहेत. अशा पाच जणींचा शोध महिनाभर आधीच घेतला जातो. जे माझ्या माहेरी व सासरी देखील हीच लगबग सुरू होती. सर्व पुजेचे साहित्य ,पंचामृत , वस्त्र माळा,लाल ,पांढरी रंगाची फूलं, व पत्र्या ..म्हणजे ८ व १६ पंत्र्यांच महत्व असत. अशी सगळी तयारी घरातील सगळे मिळून वाटून घेतात. व पुरणपोळीचा नैवेद्य असतो. मंगळागौरीची आरती केली जाते. आरती पण पुरणाचीच केली जाते, शेवटी पोथी वाचून पुजा संपन्न होते.
रांगोळ्या काढून जेवायला वाढले जाते. सवाष्ण ब्राह्मण व पाच सुवासिनी आधी घास घेतल्याशिवाय कुणीही जेवण सुरू करु शकत नाही, ही पद्धत अजूनही पाळली जाते. यात मात्र नवीन नवरीची चेष्टा करायची संधी कुणी सोडत नाही. जेवतांना नवरीने पुर्ण जेवण होत नाही तोपर्यंत बोलायचे नाही,अशी प्रथा आहे.जेवतांना तिचा नियम कसा मोडेल व ती बोलेल म्हणून वेगवेगळ्या प्रकारे मुद्दामहून तिला चिडवले जाते, खुप आनंदी वातावरणात हास्याचे फवारे उडतात. एकमेकांना घास भरवणे, उखाणे घेण्याची जणू स्पर्धाच लागते. सगळ्यांची हसुन पुरेवाट होते. यात महिलांना बोलावून संध्याकाळी हळदीकुंकू कार्यक्रम असतो.आमची नवीन सुन कशी आहे! हे दाखवण्यासाठी व नटुन थटून मिरवायला समस्त महिलांना पुर्ण संधी मिळते. त्यानंतर रात्रीचे जागरण जागण्याची पद्धत आहे. खेळ, गाणे, मंगळागौरीचे खेळ खेळून रात्र जागवली जाते.अशा पद्धतीने मंगळागौरीचे पुजन करून संसाराची सुरुवात सुखाची व समाधानाची होवो, यासाठी सर्व थोरांचे आशिर्वाद घेवून ,आलेल्या सगळ्यांना प्रेमपूर्वक निरोप दिला जातो. व मंगळागौरीचा खेळ संपन्न होतो.
मानसी जोशी, खांदा कॉलनी
Be First to Comment