पाणी वाया जाण्याबरोबरच वाहनचालकांना त्रास
सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्यातील के.टी. बंधाऱ्यातून डोलवी येथील जेएसडब्लू कंपनीत नेण्यात आलेली जे.एस.डब्लू. कंपनीची जलवाहिनी नागोठण्यातील मिरानगर भागातील इंडियन आॅईल पेट्रोल पंपासमोर तसेच उड्डाण पुला लगतच चार दिवसांपूर्वी पुन्हा एकदा त्याच ठिकाणी फुटली आहे. त्यामुळे दररोज पाणी वाया जाण्याबरोबरच या फुटलेल्या जलवाहिनीमुळे महामार्गावर खड्डे पडून जलवाहिनीचे पाणी या खड्ड्यांत भरत असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. जलवाहिनी रस्त्याच्या मधोमध फुटल्याने त्याठिकाणी सध्या संरक्षक पट्ट्या लावण्यात आल्या आहेत.
नागोठण्यातील के.टी. बंधाऱ्यातून डोलवी येथील जेएसडब्लू कंपनीत नेण्यात आलेल्या या जलवाहिनीतून नागोठण्यासह सुमारे ४५ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबई गोवा महामार्गाच्या जुन्या मार्गालगत टाकण्यात आलेली ही जलवाहिनी नंतर महामार्ग रुंदीकरणाच्या कामातील नागोठण्यातील मिरानगर येथील उड्डाण पुलाच्या कामाच्या वेळी तयार करण्यात आलेल्या पर्यायी मार्गाखाली सुमारे १२ ते १५ फुट खोलवर गाडली गेली. हीच जलवाहिनी १५ जुलै, २०१९ रोजी मोठ्या प्रमाणात फुटल्यानंतर त्यावेळी १५ दिवस बंद करण्यात आली होती. नंतर महामार्ग बंद करुन वाहतूक पर्यायी मार्गावर वळवून या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र त्यावेळी १५ दिवस ४५ गावांत सर्वत्र तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती.

नागोठणे ते डोलवी पर्यंतच्या सुमारे ४५ गावांसाठी ही जलवाहिनी सुरु ठेवण्यात आली आहे. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने ही जलवाहिनी कुठे ना कुठे वारंवार फुटल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. असे असतांनाच ही जलवाहिनी पुन्हा एकदा दिड वर्षांनंतर नागोठण्यातील महामार्गावर त्याच ठिकाणी फुटल्याने सध्या सुरूच ठेवण्यात आलेली ही जलवाहिनी नंतर दुरुस्तीसाठी किती दिवस बंद ठेवण्यात येईल या भितीने आत्ताच नागरिकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.
या संदर्भात जे.एस.डब्लू. कंपनीच्या जलवाहिनी विभागाचे मुरली नायर यांच्याशी संपर्क साधला असता, दुरुस्तीच्या कामासाठी ठेकेदाराजवळ कंपनी प्रशासनाची बोलणी सुरु असुन याबाबतीत लवकरच निर्णय होऊन जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येईल असे नायर यांनी स्पष्ट केले.








Be First to Comment