गेले सहा महिने होतेय हालहाल : महिलावर्ग संतप्त, ग्रामपंचायतीने लक्ष घालण्याची मागणी मागणी
सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्लू कंपनीकडून नागोठणेसह ४२ गावांना पाणीपुरवठा केला जातो. नागोठण्यातील काही भागांना जेएसडब्लू कंपनी कडून तर काही भागांना एमआयडीसी कडून पाणीपुरवठा केला जात असतो. एमआयडीसी कडून केला जाणारा पाणीपुरवठा नियमित चालू असतो परंतु जेएसडब्लू कंपनीकडून ज्या भागाला पाणीपुरवठा केला जातो त्या भागातील काही नागरिक दुर्भागी आहेत कारण जेएसडब्लू कंपनीकडून केला जाणारा पाणीपुरवठा गेले सहा महिने गवळआळीत येत नसल्याने ग्रामस्थांचे विशेषतः महिला वर्गाचे हालहाल होत असल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी नागोठणे ग्रामविकास अधिका-यांना निवेदन देऊन नियमित पाणीपुरवठा करण्यात यावे अशी विनंती केली आहे.
दरम्यान नागोठण्यातील इतर सर्व भागात पाणीपुरवठा सुरळीत चालू असताना गवळआळीतील पाणीपुरवठा अनियमित का ? असा सवाल गवळआळी ग्रामस्थांकडून केला जात आहे.
जेएसडब्लू कंपनीकडून ज्या भागात पाणीपुरवठा केला जातो त्या भागातील गवळआळी विभागात पाणीपुरवठा अनियमितपणे होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गवळआळीतील महिला वर्गाला पायपीट करत विहिरीवरून पाणी भरून आणावे लागत आहे. नागोठणे ग्रामपंचायत प्रत्येक नळ कनेक्शन वाल्यांकडून पाणीपट्टी घेत असते त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा बाबत या भागातील नागरिकांसाठी योग्य ती उपाययोजना केलीच पाहिजे अशी मागणी गवळआळी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
याबाबत नागोठणे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गवळआळीतील १३ ते १४ घरांना पाणी मिळत नाही. कारण जेएसडब्लू कंपनी कडून केला जात असलेल्या पाणीपुरवठ्याला आवश्यक तो प्रेशर नसल्यामुळे अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागात दोन ते तीन वेळा ग्रामपंचायतीने टँकर द्वारे पाणीपुरवठा केला आहे. तसेच गरज लागल्यास पुन्हा टँकर पाठविण्यात येईल परंतु येत्या आठ दिवसात गवळआळी भागासाठी ग्रामपंचायतीकडून नविन पाईप लाईन टाकण्यात येणार आहे तदनंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. नागोठयातील सर्व भागात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांनी स्पष्ट केले.







Be First to Comment