धूळवड
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा सण म्हणजे होळी.
आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला धुलिवंदन म्हणजेच धूळवड साजरी केली जाते.
आपल्या शालिवाहन शक महिन्यातील फाल्गुन हा शेवटचा महिना . आणि हिंदू दिनदर्शिके प्रमाणे आपला या वर्षातला हा शेवटचा सण.
आपल्या परंपरेत जर थोडं डोकावलं तर लक्षात येते की होळीच्या दुसऱ्या दिवशी थंड झालेली राख , धूळ सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना मस्तकावर लावली जायची आणि धरणी मातेला म्हणजेच जमीनीला , मातीला नमस्कार करण्याची प्रथा होती .
वन्दितासि सुरेन्द्रेन ब्रम्हणा शंकरेन च |
अतस्त्वं पाही नोदेवि भूते भूतप्रदा भव ||
हे धूली तू ब्रम्हा विष्णू महेश यांना वंदित आहेस म्हणून हे भूते देवी तू आम्हाला धनधान्य , समृद्धी , ऐश्वर्य देणारी हो आणि आमचं रक्षण कर अशी धरणीमातेला म्हणजेच पृथ्वीला प्रार्थना केली जाते.
आपला देह हा पंचमहाभूतां पासून बनलेला .
पृथ्वी , आप , तेज, वायू आणि आकाश.
म्हणजेच पृथ्वी पासून सुरू होऊ आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्वांना आपल्या सणांच्या माध्यमातून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धूलिवंदन , धूळवड.
आजच्या या सणाचे सध्याच्या काळात स्वरूप बदलले असले तरी मोठ्या प्रमाणात एकमेकांना रंग लावून आनंदानं हा सण साजरा केला जातो.
फाल्गुन पौर्णिमे नंतर पाच दिवसांनी म्हणजे फाल्गुन कृष्ण पंचमीला ग्रामीण भागात रंगपंचमी खेळली जाते . मोठ्या उत्सवाने आणि उत्साहानं रंगपंचमी साजरी केली जाते .
यादिवशी पृथ्वीला वंदन केले जाते यानंतर बरोबर पंधरा दिवसांनी म्हणजे गुढी पाडव्याला आकाशाला भिडणारी गुढी उभारणी करून आकाशा प्रती आदर व्यक्त केला होतो .
धूळवडीचे कृषी संस्कृतीत देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे .
शेतकरी , बळीराजा हा सण खूप उत्सवात साजरा करतो.
पुन्हा पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे साधारण जून पर्यंत थोडा विश्रांतीचा काळ.
रोहिणी नक्षत्रात यायचा दिवस म्हणजे शेतातली सुगी संपलेली असते.
शेतातले गहू , ज्वारी , हरभरा यासारखी अनेक पीकं सुगीचा हंगाम संपून घरांत येतं. आणि हे नवीन पीक अग्नी देवतेला या निमित्तानं नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो आणि पृथ्वी आणि एकूणच पंचमहाभूतां विषयी बळीराजा कृतज्ञता व्यक्त करतो .
कोकणात हा सण मुख्य सण म्हणून अतिशय जल्लोषात साजरा होतो . ग्रामदेवतेच्या पालख्यांची मिरवणूक पौर्णिमेच्या अगोदर पासूनच सुरू असते.
या वर्षी कोविड मुळे अनेक सणांवर बंदी असली तरी प्रत्येकाच्या मनांत आपल्या परंपरा आणि सण यांच्या विषयीचा आदरभाव राखून घरत राहूनच हे उत्सव साजरे केले जात आहेत .
लवकरच आजचे जे वातावरण संपून नव्यानं पुन्हा पहिल्या सारखेच सुरळीत होऊ दे अशी सर्व व्यापी या धरणीमातेला पृथ्वीला प्रार्थना करूया .
सर्वेपि सुखीनस्न्तु सर्वे सन्तु निरामयाः
सर्वे भद्रानि पश्यन्तु माः कश्यित दुःख माप्नुयात ||
संगिता थोरात, नवीन पनवेल







Be First to Comment