Press "Enter" to skip to content

रंगभूमी-एक जग

रंगभूमी-एक जग

२७ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. रंगभूमीतील कलाविष्काराचे जागतीकरण व्हावे,या उद्देशाने हा दिवस साजरा होतो. भारतात बहुभाषिक तसेच वैविध्यपूर्ण स्वरुपात रंगभूमीचा आविष्कार बघायला मिळतो. महाराष्ट्रातही रंगभूमी परंपरा किर्लोस्कर यांच्या काळापासून सुरु होवून आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे.
अस म्हटलंय…
कसली जादू घडते ?
मखमल जणू उलगडते
कलाकारांसह प्रेक्षकांचे
भावविश्व बदलूनी जाते…
नाटक ही एक जिवंत कला आहे.आणि त्यामुळेच प्रत्येक प्रयोग हा सारखाच असुनही नवीन भासतो.:
पहिली,दुसरी,तिसरी घंटा…आणि त्यानंतर नाट्य कलाकार आणि रसिक हे एकत्रीतपणे स्वतःला त्या कलाकृतीच्या स्वाधीन करतात.
असं म्हणतात की, जादुगार जसा आपल्या पोतडीतून एकेक वस्तु बाहेर काढतो…तसं एकेक पात्र येतं…आणि रसिकांच्या मनाचा ताबा घेतं..
नाटकात दुसरी संधी नसते, त्यामुळे पडदा पडेपर्यंत ते पात्र जिवंत ठेवणं गरजेचं असतं..इथे रिटेक नाही त्यामुळे एकाग्रता आणि प्रसंगावधान खूप आवश्यक…
आपल्या भूमिकेत फक्त आपल्या वाक्यांपुरत शिरायचं नसतं…तर अगदी पडदा पडेपर्यंत ती जगायची असते.तेव्हाच रसिकही त्या कथेत,प्रत्येक पात्रात गुंतल्या जातो.
नाटक म्हणजे केवळ अभिनय नाही,तर लेखन,दिग्दर्शन, वेशभूषा,संगीत,नेपथ्य,प्रकाशयोजना आणि कलाकार यांचे त्या प्रयोगासाठी एकत्र आलेले एक कुटुंबच असते.आणि कुटुंबातील प्रत्येकाला त्याची जबाबदारी योग्य त-हेने पार पाडावी लागते.खूप सुखद असा हा अनुभव असतो.
नाटक एकाचवेळी अनेक पातळ्यांवर सुरु असतं…सभागृहा मध्ये,विंगे मध्ये,बॅक स्टेज मध्ये,संगीत/प्रकाश योजना यामध्ये…
अशाप्रकारे नाटकाचा एकच प्रयोग वेगवेगळ्या पातळीवर एकाच वेळी सूरु असतो.
यातील प्रत्येकजण वेगवेगळ्या पातळीवर ती कलाकृती जगत असतो.
रसिक आणि सर्व कलाकार यांच्या मधील हा जिवंत संवाद असतो.
कलाकाराच्या मनावर चिरंतन राज्य करणारी अशी ही रंगभूमी,कलाकाराला स्वतःची ही ओळख करुन देत असते.
शेक्सपिअर यांनी “जग हे एक रंगभूमी आहे”असं म्हटलंय…पण याच उलट केलं तर,”रंगभूमी हे एक जग आहे”…
या जगात जो रमला, त्यालाच त्या जगातील आनंद कळतो…जाणवतो…

रंगभूमी वरील प्रत्येक कलाकार हा…
नटराजाची पूजा करुनी रंगभूमीला वंदन करतो…
पात्रात त्या शिरुनी आपली भूमिका जगतो…
रसिक मायबाप यांच्याशी जिवंत संवाद साधतो…
अशा सर्व कलावंतांना,अजरामर व्यक्तिरेखांना,नाट्य कलाकृतींना जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मानाचा मुजरा…🙏

वैशाली केतकर, (नाट्यदिग्दर्शिका),
नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.