वाकण नाक्यावर निवारा शेड नसल्याने प्रवाशी सोसतायेत उन्हाचे चटके
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
मार्च महिना सुरू झाल्यापासुन संपुर्ण रायगड जिल्ह्यात वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. त्यातच मुंबई -गोवा महामार्गाचे काम संथ गतीनेच सुरू असल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर असणा-या वाकण नाक्यावरती ऐन मार्च महिन्याच्या वाढत्या तापमानामुळे या नाक्यावर प्रवाशांना ऊभे राहण्यासाठी निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशीवर्गाला मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे प्रवाशी वर्गांतुन नाराजीचे सुर उमटत आहेत. त्यामुळे महामार्गाचे काम होईल तेव्हा होईल पण वाकण नाक्यावर तातडीने तात्पुरत्या स्वरूपात का होईना निवारा शेड भारण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
मुंबई -गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापुर दरम्यानच्या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासुन सुरु आहे. या कामासाठी महामार्गावरील अनेक ठिकाणचे बस थांबे व सावलीचा आधार असलेली झाडे मुंबई -गोवा चौपदरीकरणात तोडण्यात आल्यामुळे अनेक वर्षांपासुन ऊन, वारा, पाऊस तसेच आताच्या वाढत्या हिटच्या तिव्रतेमुळे वाहनांची वाट पाहत ऊभे राहणा-या प्रवाशी वर्गांमध्ये मनस्ताप होत आहे. महामार्गाचे काम पुर्ण होण्यास किती काळावधी लागेल हे अदयापही सांगता येत नाही. पंरतु महामार्गावरील महत्वाचा नाका असलेल्या वाकण नाक्यावरील देखिल सावलीचा आधार असलेली झाडे तोडली गेल्याने सद्यपरिस्थितीत प्रवाशांना मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे वाकण नाक्यावरती तात्पुरती का होईना पण प्रवाशांसाठी निवारा शेड उभारावी व प्रवाशी वर्गांला दिलासा मिळावा अशी मागणी प्रवाशी वर्गात जोर धरत आहे.
महामार्गावरील वाकण नाक्यावरुन मुंबई, ठाणे, महाड, खोपोली, रोहा अलिबाग या ठिकाणी जाण्याकरीता नागरीकांना वाकण नाक्यावर थांबावे लागते. तसेच या ठिकाणी निवारा शेड नसल्याने प्रवाशांना रस्त्याच्या कडेला ऊभे राहुन वाहनांची वाट बघावी लागत आहे. या मार्गावर छोट्या-मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असुन प्रवाशांना रस्त्यावर उभे राहणे कठीण व धोकादायक झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवुन वाकण नाक्यावरती सुसज्य बसथांबा उभारण्यासंबधित प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी नागरीक व प्रवाशी वर्गांतुन होत आहे.








Be First to Comment