Press "Enter" to skip to content

महावितरणच्या ॲपने बिल भरताय???
सावधान! तुमच्या डोक्याचा ताप वाढू शकतो

महावितरणच्या ॲपने बिल भरताय???
सावधान! तुमच्या डोक्याचा ताप वाढू शकतो

सिटी बेल / exclusive

          काही म्हणा मंडळी, या कोरोनाविषाणू ने आपल्याला भरपूर काही शिकवलं आहे. कोण आपले? कोण परके? ओळखायला सुद्धा आपण याच कालखंडात शिकलो. तुमच्याकडे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी अन्नधान्य असो किंवा नसो तुम्हाला महावितरणचे पैसे मात्र दिलेच पाहिजेत ही कडक शिस्त सुद्धा आपण याच कालखंडात अनुभवली.कुणी निंदा कुणी वंदा लोकांना लुटून खाणे आमचा धंदा!!! हे महावितरणचे ब्रीदवाक्य आहे हे कोरोना कालखंडात अधिक स्पष्टपणे जाणवले. ही बातमी वाचा म्हणजे तुमचा सुद्धा महावितरणच्या लुटमारी वरती विश्वास बसेल.
       विजय चंद्रकांत पाटील हे पनवेल च्या परदेशी आळी येथील नागरिक. चालू महिन्याचे बिल आणि थकबाकी असे मिळून त्यांनी १२,२७०/- रुपये भरण्यासाठी महावितरणचे अँड्रॉइड ॲप आपल्या मोबाईल मध्ये उघडले. यापूर्वी त्यांनी चार ते पाच वेळा अशाच पद्धतीने ॲप मधून विजेचे बिल अदा केले होते. देय रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर सुद्धा रिसिप्ट जनरेट न झाल्यामुळे व्यवहार पूर्ण न झाल्याचा संदेश झळकला. अर्थातच देयकाची रिसिप्ट नसेल तर बिल भरले गेले नाही असा महावितरणचा दंडक आहे.त्यामुळे विजय पाटील यांनी पुन्हा तितक्याच रकमेचे ट्रान्सफर केले. यावेळेस रिसिप्ट जनरेट झाल्यामुळे बिल भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली याची त्यांना खात्री पटली. परंतु काही मिनिटांतच त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र च्या खात्यामधून २४,५४०/- रुपये महावितरणच्या खात्यात वळते झाल्याचा संदेश आला. याचा अर्थ सरळ होता,त्यांच्या खात्यातून दोन वेळा ही रक्कम कापली गेली होती.
        या नंतर महावितरण सोबत पाठपुरावा केल्यानंतर विजय पाटील यांना धक्कादायक उत्तरे ऐकायला मिळाली.एक डझन भर फोन आणि अर्धा डझन खेपा मारल्यानंतर त्यांना असे उत्तर मिळाले की सदर अँड्रॉइड ॲप महावितरण चालवत नसून याकरता एक त्रयस्थ पार्टीला कंत्राट दिलेले आहे. आणि ह्या अँड्रॉइड ॲप मधून ग्राहकांना पैसे परत देण्याची कुठलीही सुविधा नाही. त्यामुळे तुम्ही भरलेले अधिक चे १२,२७०/-  रुपये आमच्या कडे जमा राहतील.
         लॉक डाऊन च्या काळात लोकांचे काम धंदे बंद झाल्यानंतर अनेक लोकांची वीज बिल थकली. अर्थातच अर्थचक्र बिघडल्यामुळे कित्येक लोकांनी दोन तीन महिन्याची बिले उशीराने अदा केले.अशा वेळेस या वैश्विक आपत्तीचे स्वरूप पाहता महावितरणकडून थकबाकी वसूल करणे अपेक्षित नव्हते. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात महावितरणचा खोटेपणा उघडा पडला. उपमुख्यमंत्री महोदयांची मीटर तोडू नये! याची घोषणा फक्त अधिवेशनापूर्वीच मर्यादित होती. काल-परवापर्यंत अरेरावी आणि मग्रुरीने वसुली करणाऱ्या महावितरणचा आता डल्ला मारणारा दरोडेखोर चेहरा देखील समोर आला आहे.
        याबाबत विजय पाटील यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की माझ्यासारखे चुकून जास्त पैसे दिलेले हजारो ग्राहक या राज्यामध्ये असतील.एरवी ग्राहकांना कुठल्याही पद्धतीची सवलत न देणाऱ्या महावितरण सारख्या कंपनीकडे ग्राहकांना परतावा देण्याची सिस्टीम नाही! यावर माझा विश्वासच बसत नाही. अशा पद्धतीने महावितरण करोडो रुपये त्यांच्या गाठीशी जमा करून ठेवत असतील. आज या निमित्ताने महावितरणचा खोडसाळपणा सगळ्यांसमोर आणण्याच्या उद्देशाने मी शक्य तितक्या वरपर्यंत हे प्रकरण घेऊन जाणार आहे.
       म्हणूनच ग्राहक राजा सावध हो! महावितरणचे अँड्रॉइड ॲप वापरण्यापूर्वी चार वेळा विचार करा.
       

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.