विचारधारा – २ *प्रेम*
प्रेमाच्या व्याख्या करू तशा आहेत. कोणाचे प्रेम हळवे तर कोणाचे प्रेम रानटी असते. फक्त परिभाषा अशा वेगवेगळ्या. कोणी म्हणते खरे प्रेम त्यागात असते तर कोणी म्हणते ते वात्सल्यात गवसते.
थोडक्यात काय तर दुसऱ्यावर केलेले निष्काम व प्रामाणिक प्रेम म्हणजे खरे प्रेम.
पण बघा ना. जरा पाच-दहा मिनिटे वेळ काढून विचार करू या की, खरंच आपण या अशा खऱ्या-सत्य, शाश्वत प्रेमाशी एकरूप आहोत का?
आपण समाजसेवेचे विविध उपक्रम राबवतो व त्याला छान असे नाव देतो की, निष्काम सेवा. निष्काम याचा अर्थ कामनारहित. मग ही सेवा करताना कधीच कोणतीच स्वार्थाची वा परमार्थाची इच्छा मनात येत नाही का? तर ‘हो’ असेच असते. कारण दोन्हीही इच्छा पुण्य प्राप्तीच्या असतात. म्हणजे निष्काम व प्रामाणिक प्रेम हे ना आजवर झाले ना होईल.
देवांस ही न चुके जिथे स्वार्थ व परमार्थ;
तिथे आपण तर त्याच्या कठपुतल्यारुपी मानवी अर्थ…
खरे निष्काम व प्रामाणिक प्रेम म्हणजे चराचरी व्यापलेले चैतन्य. आणि हे चैतन्य ज्यात अधिक प्रमाणात भरलेले त्यास म्हणावे देवत्व प्राप्त संत!
✍️ लेखिका ✍️
श्वेता जोशी, नवीन पनवेल







Be First to Comment