Press "Enter" to skip to content

उरण वीज कार्यालयाचा सावळा गोंधळ


वीज बिल भरूनही विद्युत प्रवाह खंडीत करण्याचा प्रताप

सिटी बेल । उरण । घनःश्याम कडू ।

उरण तालुक्यात वीज बिलाची थकबाकी 15 ते 16 कोटीच्या आसपास गेली आहे. त्यामुळे वीज कट करण्याची मोहीम सुरू आहे. परंतु वीज बिल भरूनही विद्युत प्रवाह खंडीत करण्याचा प्रताप उरणच्या वीज कार्यालयातून सुरू आहे.

यावरून उरण वीज कार्यालयाचा सावळा गोंधळ सुरू असल्याचे उघड होत आहे. मात्र वीज मंडळाचे कर्मचारीच बार, हॉटेल, बेकरी व इतर व्यावसायिकांना वीज कनेक्शन चिरीमिरी घेऊन थेट करून देत असल्याची चर्चा उरण परिसरात सुरू आहे. त्यांची वीज बिल तपासली तर नक्कीच लाखोंचा महाघोटाळा उघड होईल.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होऊन आज वर्ष होण्यास आले आहे. ग्राहकांना वीज बिल माफ होतील असे वाटत होते. त्यामुळे वीज बिले न भरल्याने करोडो रुपयांची थकबाकी झाली होती. मात्र वीज बिल कमी न होता ज्यांची थकबाकी आहे, अशा ग्राहकांचा विद्युत प्रवाह खंडीत करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु त्यात ही आपला तो बाब्या दुसर्‍याचा तो कार्टा या उक्तीप्रमाणे जे थकबाकीदार चिरीमिरी देतात त्यांचा विद्युत प्रवाह खंडीत करण्याचे आदेश असूनही त्यांची लाईन कट केली जात नाही.

उरणचे वीज कार्यालय कर्मचारी तर यापुढेही जाऊन वीज बिल भरूनही कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत प्रवाह खंडीत करीत आहेत. याबाबत वीज कार्यालयाचे अधिकारी झळके यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी 025510271851 हा मीटर नंबर घेऊन तपासणी केली असता 8 मार्च रोजी ऑनलाईन वीज बिलाचा भरणा केला असल्याचे उत्तर दिले. मात्र लाईन कट करण्यास सांगितले नसल्याचे उत्तर देतात. मग लाईन कट का केली? 8 मार्च रोजी संपूर्ण बिल भरूनही लाईन कट कशी होते. त्याची माहिती सबंधीत वायरमनला देत नसल्याचे उघड होते. अथवा जाणूनबुजून मानसिक त्रास देण्याच्या हेतूने ही कारवाई करीत असावी असे बोलले जाते.

उरण तालुक्यातील बार, हॉटेल, बेकरी, व्यापारी वर्ग यांच्याकडून विजेचा वारेमाप वापर होत असूनही त्यांची वीज बिल ही काहींच्या घरगुती वापरापेक्षा कमी असल्याचे दिसून येते.
कारण वीज कर्मचारी यांची नेहमीच उठबस त्यांच्याकडे असते अथवा काही कर्मचारी आर्थिक साटेलोटामुळे ज्यावेळी ज्यांचा विजेचा वापर जास्त असतो त्यावेळी वीज कनेक्शन हे मीटर मधून काढून डायरेक्ट करून देतात. पुन्हा काही तासांनी वीज लाईन पूर्ववत करतात. त्यामुळे त्यांची वीज चोरी उघडकीस येत नाही. तर काही राजकीय पदाधिकार्‍यांना वीज चोरी करताना पकडूनही त्यांची नावांची माहिती मागूनही ती न देता त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे.

मात्र सर्वसामान्य जनतेला कायद्याचा बडगा दाखविणारे हे अधिकारी वर्ग सर्वांना एकच न्याय का देत नाही. तसेच मीटर रिडींग नेली जाते ती दिलेल्या मुदतीनंतर नेली जातात व वीज बिल ही घरपोच न देता इमारतीच्या खाली एखाद्या कोपर्‍यात टाकून पसार होतात. तरी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उरण वीज कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी केली तर नक्कीच विजेचा करोडोचा महाघोटाळा उघड झाल्याशिवाय रहाणार नाही. कारण काही अधिकारी वर्ग हे दोन ते तीन वर्षांत करोडोची मालमत्ता गोळा करण्यात यशस्वी होत असल्याची चर्चा उरणच्या नाक्या नाक्यावर सुरू आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.