प्रकल्पग्रस्तांना दिलेली आश्वासने सिडकोने पाळलीच पाहिजेत
अन्यथा सिडकोची सर्व कामे आम्ही बंद पाडून सिडकोविरोधात आम्हाला आंदोलन उभारावे लागेल : कामगार नेते महेंद्र घरत
सिटी बेल । बेलापूर ।
उरण, पनवेल तालुक्यातील न्हावा शिवडी सी-लिंक प्रकल्प, एमटीएचएल, नेरूळ उरण रेल्वे प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग ४ आदी प्रकल्पांची कामे अंतिम टप्प्यात आली तरीसुद्धा सिडकोने संबंधित प्रकल्पग्रस्तांना दिलेले आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे याबाबत इंटक चे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिलेले आश्वासन पाळा अन्यथा उग्र आंदोलन पेटवावे लागेल असा सज्जड इशारा सिडको अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत दिल्या.
सिडकोने २२.५ % भूखंड परतावा दिलेला नाही स्थानिक क्रशर- कॉरी मालकांना व्यवसायासाठी पर्यायी जागा दिलेली नाही. याव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांची गोदामे, घरे तोडली त्यांना अद्याप भूखंड दिले नाहीत. परंतु परप्रांतीय लोकांना, व्यावसायिकांना मात्र ताबडतोब भूखंड दिले गेलेत. याबद्दल प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्यात सिडकोविरोधात प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे गव्हाण येथील ७ घरांचा प्रश्न आहे तोसुद्धा तातडीने सोडवावा व सिडकोच्या उलवे नोडमधील हाउसिंग प्रकल्पामध्ये त्यांना प्लॉट देण्यात यावेत अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी सिडकोच्या बेलापूर येथील मुख्यालयामध्ये कामगार नेते आणि प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी व सिडको अधिकारी यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नासंदर्भात चर्चा करून प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत; अन्यथा सिडकोची सर्व कामे आम्ही बंद पाडून सिडकोविरोधात आम्हाला आंदोलन उभारावे लागेल, असा सज्जड दम दिला. यावर सिडको अधिकार्यांनी ताबडतोब आम्ही माहिती घेऊन प्रलंबित राहिलेले प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे वचन कामगार नेते महेंद्र घरत आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिले.
या बैठकीला इंटकचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, अतुल पाटील, सुरेश पाटील, इंटकचे उरण तालुका अध्यक्ष संजय ठाकुर, बाळाशेठ पाटील, नरेश घरत, यशवंत घरत, धर्माशेठ पाटील, सुरेश ठाकूर, धर्मदास घरत, दीपक पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment