सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
विधान परिषद सदस्य आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी आपल्या कौशल्याने आणि राजकीय शैलीत एक भला मोठा मासा राष्ट्रवादीच्या गळाला लागणार अशा आशयाच्या बातम्या गेल्या आठ दिवस येत होत्या.या गोष्टीला दि पूर्णविराम गीताबाग येथे मिळाला असून सुरेश मगर आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सुतारवाडी येथील गीताबाग मध्ये संपन्न झालेल्या पक्ष प्रवेशामध्ये शासनाचे नियम पाळून पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदितीताई तटकरे, आमदार अनिकेतभाई तटकरे, कार्याध्यक्ष मधुकर पाटील, शिवराम शिंदे, रामचंद्र सकपाळ, श्री महाले, नंदकुमार म्हात्रे, भाई टके, सुरेश महाबळे, विजयराव मोरे, विनोद पाशिलकर, शंकरराव भगत तसेच विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते, महिला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सुरुवातीला कार्याध्यक्ष मधुकर पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की सुरेश मगर यांचा राष्ट्रवादी पक्षातील प्रवेश हा ऐतिहासिक असून वंदना वायगुडे, अरविंद मगर, मनाली मगर, हरिश्चंद्र मोरे, संतोष शिर्के, समीक्षा सुतार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सुरेश मगर समर्थकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
पक्ष प्रवेश केल्यानंतर सुरेश मगर यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, रायगडचे चित्र बदलण्याचे काम खासदार सुनिल तटकरे यांनी केले आहे. मी पंचवीस ते तीस वर्षे राजकारण करत आलो आहे पण ज्या किमया सुनिल तटकरे करू शकतात त्या कोणीही करू शकणार नाही. दत्ताजीराव तटकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून सुनिल तटकरे निस्वार्थीपणे राजकारणात समाज सेवा करत आहेत. मला असे वाटते की आता विरोधक कोणीही शिल्लक राहणार नाहीत.मी या अगोदर राष्ट्रवादी विरोधात अनेक वेळा प्रचार केला. अनेक वेळा राष्ट्रवादीविरोधात बोललो. ना.ना म्हणणारे सुनिल तटकरे यांच्या विकास कामांना भावून लोटांगण घातले.
रायगड जिल्ह्यात विकास काम कोणी केली असतील तर खा.सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी अनेक विकासकामे केली आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला रायगडचे पालकमंत्री कोण होणार हे माहीत नव्हते. अनेक दिग्गज शर्यतीत होते. मात्र आदिती ताई रायगडच्या पालकमंत्री झाल्या. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची पदे दिली आहेत हे पाहून विरोधकांच्या भुवया उंचावल्या. अनेक वर्षांनी मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांची पोकळी तटकरे साहेबांनी भरून काढावी. तसेच धाटाव एम.आय.डी.सीमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हॉस्पिटल ची निर्मिती करावी. लांडर वाशी मध्ये लाईट बिल थकल्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तो साहेबांनी सोडवावा.
मी अगोदर पक्ष प्रवेश केला असता तर या माझ्या भागाचा अधिक विकास झाला असता. आम्ही शंभर टक्के मनाने आणि शरीराने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. साहेबांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहून या भागाचा उर्वरित विकास करावा अशी भावना सुरेश मगर यांनी व्यक्त केली. खासदार सुनिल तटकरे यांनी पक्ष प्रवेश केलेल्या सुरेश मगर तसेच त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की कोविड काळात मर्यादित जनतेच्या समूहात सुरेश मगर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे.
धाटाव परिसराचा विकास करण्यासाठी भाई पाशिलकर आणि अनिल भाऊ तटकरे यांचा सिंहाचा वाटा आहे. दत्ताजीराव तटकरे यांनी त्यावेळी राजकारणात सामाजिक काम मोठ्या प्रमाणावर केली. धाटाव परिसरात यापुढेही कोणतीही विकास कामांची उणीव भासणार नाही. सुरेश मगर यांनी मागणी केल्याप्रमाणे कामगारांसाठी सुसज्ज असे हॉस्पिटल उभारण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. कळत न कळत तुमच्या आणि आमच्यात दुरावा निर्माण झाला होता. एका झेंड्याखाली पूर्वी आलो असतो तर अधिक विकास झाला असता. शैक्षणिक गुणवत्ते प्रमाणे तरुण-तरुणींना स्थानिक पातळीवर काम देणे आवश्यक आहे. आम्ही लांडरगावात सुख दुखात नेहमी सहभागी असतो. लांडर गावात शिवस्मारक व भव्य मंदिर आम्ही उभा केला आहे. २०२४ पर्यंत महाआघाडीच्या सरकारला कोणीही धक्का लावणार नाही. देशाच्या राजकारणात शरद पवार साहेबांनी विधायक वळण लावण्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगून शेवटी सांगितले की आज आपण विचाराने एकत्र आलो आहोत त्यामुळे आपल्या भागाचा परिसराचा जिल्ह्याचा विकास जोमाने करायचा आहे.
रोह्याचा चेहरा मोहरा बदलला आहे आणखी बदलायचा आहे. यावेळी बाबू खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली सांगी येथील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यांचेही भव्य स्वागत खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी केले.








Be First to Comment