ग्रामसेवक मोरे यांनी आरोप फेटाळले
सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
धुतुम ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी यांनी मनमानी कारभार करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप काँग्रेस व शिवसेना सदस्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. तर ग्रामसेवक विनोद मोरे यांनी या आरोपाचे खंडन करून ते फेटाळले आहेत.
धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेश्मा शरद ठाकूर निवडून आल्या. सुरुवातीला ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत झाला. मात्र कालांतराने सत्ताधाऱ्यांनी ग्रामसेवक विनोद मोरे यांना हाताशी धरून मनमानी कारभार करीत भ्रष्टाचाराला सुरुवात झाली.
ग्रामपंचायतीची पहिली मासिक सभा ६डिसेंबर २०१७ रोजी झाली. त्यामध्ये जनतेच्या हिताचे निर्णय न घेता त्यांच्या स्वतःला आर्थिक लाभ होणारे निर्णय घेतले. हा प्रकार प्रत्येक सभेत घडू लागला. ग्रामसेवक विनोद मोरे यांनी सभांचे कामकाजाचे इतिवृत्तांत त्याच दिवशी प्रोसिडिंग बुकमध्ये लिहिले नाही. फक्त मासिक सभेच्यावेळी हजर असलेल्या सदस्यांच्या सह्या प्रोसिडिंग घेत असत. सत्ताधारी ग्रामसेवकांच्या मदतीने त्यांचे मर्जीनुसार ठराव करून त्यांच्या इच्छेनुसार इतिवृत्तांत प्रोसिडिंग बुकात लिहिलेले आहेत. पुढील सभेच्यावेळी इतिवृत्तांत वाचल्यानंतर जे ठराव झालेलेच नाहीत ते ठराव मागील इतिवृत्तांत दिसून आल्यावर हरकती नोंदवूनही त्याची दखल घेतली जात नाही.
ग्रामपंचायत सदस्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवून व अपिलात जाऊनही ही माहिती दिली जात नाही. तसेच स्टॉक रजिस्टरची लेखी मागणी करूनही आजतागायत दिलेले नाही. तसेच बँक खाते राष्ट्रीय बँकेत असणे जरुरीचे असताना इतर बँकेत खाते काढून ५७ लाख जमा केले आहेत. अंगणवाडी पोषण आहार खरेदीसाठी चेक दिले पण खरेदीची बिले नाहीत. हाताने बिले लिहून दिली आहेत. सदरची बिले बोगस व खोटी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मासिक सभांच्या खर्चाची पडताळणी करता ३० नोव्हेंबर २०१९ व ३० डिसेंबर २०१९ या दोन्ही मासिक सभांचा सर्व खर्च समान दाखविल्याचे दिसून येत आहे. तसेच इतर अनेक सामानाची बिलेच नाहीत यावरून ग्रामपंचायतीमध्ये करोडोचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काँग्रेस शिवसेना सदस्य रविनाथ बाळाराम ठाकूर, अंगत लक्ष्मण ठाकूर, निर्मला राजेश ठाकूर व पूजा लक्ष्मण ठाकूर यांनी केला आहे.
याबाबत गटविकास अधिकारी व ग्रामविस्तार अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करूनही ते सहकार्य करीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामसेवक विनोद मोरे यांनी भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती गोळा केली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.तसेच मिळणाऱ्या शासकीय निधींचा ही मोठ्या प्रमाणात अपहार केला असल्याचा संशय व्यक्त केला. तरी केलेल्या भ्रष्टाचाराची व अपहाराची निश्चिती होण्यासाठी धुतुम ग्रामपंचायतीचे २०१८ ते आजतागायत विशेष लेखापरीक्षण महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत १९६१ अन्वये करण्यात यावी अशी मागणी करून त्यांच्या प्रती मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
याबाबत ग्रामसेवक विनोद मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपण माहिती दिली असून कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केला आहे.








Be First to Comment