सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
जेएनपीटीच्या ३७.५० कोटी खर्चाच्या मंजूर करण्यात आलेले आणि मागील दोन वर्षांपासून केवल पर्यावरण विभागाच्या अडथळ्यामुळे रखडलेल्या घारापुरी बेटासभोवार उभारण्यात येणाऱ्या संरक्षक भिंत व सागरी तटबंदीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
बेटासभोवार उभारण्यात येेेेणाऱ्या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या तटबंदीमुळे समुद्राच्या लाटाने सागरी किनाऱ्याची होणारी प्रचंड थांबण्यास मदत होणार आहेच.शिवाय बेटाच्या सभोवताली फेरफटका मारण्याचा आनंदही बेटावर दरवर्षी येणाऱ्या लाखो पर्यटकांना लुटता येणार आहे.
जेएनपीटी बंदराच्या उभारणीमुळे जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावरील सागरी किनारपट्टीची प्रचंड धूप झाली आहे.समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी धूप थांबविण्याची मागणी शिवसेनेचे घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी सातत्याने जेएनपीटीकडे लाऊन धरली होती.सेनेच्या माध्यमातून घारापुरी सरपंचांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर दोन वर्षांपूर्वी जेएनपीटीने बेटावरील किनारपट्टीची मोठ्या प्रमाणावर होणारी सागरी धूप थांबविण्यासाठी बेटासभोवार सुमारे तीन किलोमीटर लांबीची संरक्षक भिंत, तटबंदी उभारण्यासाठी ३७.५० कोटी खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे.

या कामाच्या निविदा मंजूरीनंतर जेएनपीटीने कामाची वर्कऑर्डरही काढली आहे.मात्र पर्यावरण विभागाकडून आवश्यक परवानग्या वेळेत मिळविण्यात जेएनपीटी अपयशी ठरली.त्याशिवाय काही पर्यावरणवादी संस्थांच्या केलेल्या विरोधामुळे घारापुरी सागरी तटबंदीचे काम मागील दोन वर्षांपासून रखडले होते.परिणामी मागील उधाणाच्या भरतीच्या समुद्राचे पाणी किनारपट्टीची पातळी सोडून आता सुमारे १५ मिटर अंतरापर्यंत आत घुसले आहे.शिवाय समुद्राच्या पाण्याच्या प्रचंड लाटांनी घारापुरी बेटावरील शेतबंदर, मोराबंदर, राजबंदर या तीन्ही गावांसभोवार असलेल्या किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे.तसेच मोराबंदर,शेतबंदर या दोन गावात समुद्राचे पाणी शिरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. मोरा बंदर किनाऱ्यावरील तर रस्तेच उध्दवस्त होऊन वाहुन गेले आहेत.समुद्राच्या सागरी किनारपट्टीबरोबरच बेटावरील गावांनाही धोका निर्माण झाला आहे.

याबाबत सरपंच बळीराम ठाकूर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता.
अखेर सरपंच बळीराम ठाकूर आणि जेएनपीटीच्या पाठपुराव्यानंतर पर्यावरण विभागाकडून परवानग्या मिळविण्यात यश मिळाले आहे.त्यानंतर जेएनपीटीच्या माध्यमातून एलिफंटा बेटावरील राजबंदर ते शेतबंदर अशी समुद्र किना-याला लगत साधारण तीन किलोमीटर लांबीची संरक्षण भिंत उभारण्याच्या कामाचा
सरपंच बळीराम ठाकूर यांच्या हस्ते राजबंदर येथे श्रीफळ वाढवून श्रीगणेशा करण्यात आला.

याप्रसंगी ठेकेदार फेरो सिमेंट इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रकल्प अधिकारी यादव यांच्यासह अन्य अधिकारी, उपसरपंच सचिन म्हात्रे, सदस्य मंगेश आवटे, भरत पाटील, शेखर पांचाळ,विजय पांचाळ, प्रेमानंद शेवेकर, देवेद्र म्हात्रे, सुरज घरत,जितेश म्हात्रे, वैभव सुतार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बेटासभोवार उभारण्यात येत असलेल्या सागरी तटबंदी, संरक्षण भिंतीमुळे समुद्राच्या लाटांमुळे होणारी समुद्र किना-याची धुप थांबणार आहे.तसेच बेटावर येणा-या पर्यटकांना एलिफंटा बेटाच्या सभोवताली पर्यटन करण्यास मिळणार आहे.यासाठी घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकुर यांनी जेएनपीटी प्रशासनाचे आभार व्यक्त करुन धन्यवाद दिले आहेत.








Be First to Comment