Press "Enter" to skip to content

माजी उपसरपंच अनंता पाटील यांच्या लढ्याला यश

कसळखंड ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांचे पद बरखास्त

उपसरपंच आणि अन्य एका सदस्यांना सुद्धा केले पदच्युत

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचा निर्णय

खोट्याच्या कपाळी आला गोटा

भ्रष्टाचारी सदस्यांवर आता गुन्हा दाखल करण्याची होत आहे मागणी

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

कसळखंड ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांच्या सह उपसरपंच रंजना नाईक आणि सदस्य रोहित घरत यांची पदे बरखास्त करत असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकताच दिला.

गावकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर गाढवाचा नांगर फिरवून या तिघांनी अक्षरशः ग्रामपंचायत कसळखंड लुटून खाल्ली आहे.त्यांच्या भ्रष्टाचारी साम्राज्याला माजी उपसरपंच अनंत हरिभाऊ पाटील यांनी दणका दिला आहे. भ्रष्टाचारांतील सर्व प्रकरणांचे दस्तावेज सादर केल्यानंतर प्राप्त दस्तावेज अन्वये जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी भ्रष्टाचारी सदस्यांचे पद काढून घेतले आहे.त्यांच्या निर्णयाचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.

याबाबत अनंता पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचारी सदस्यांचे कारनामे उघड केले. ते म्हणाले की, ग्रुप ग्रामपंचायत कसळखंडच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांचे पती माजी उपसरपंच अनिल पाटील यांनी 85/1 या सरकारी गुरुचरण जागेत २०१४ रोजी, उपसरपंच रंजना नाईंक यांचे घर क्र.580(सर्व्हे नं ३४) आणि सदस्य रोहित घरत वनविभागाच्या जागेत घर नं.१०२,५०७(सर्व्हे नं.७५) अतिक्रमण करून बांधकाम केल्याचे सिद्ध होत असल्याने ग्रामपंचायत कसळखंड येथील सरपंच माधुरी अनिल पाटील, उपसरपंच रंजना राम नाईक माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य रोहित तुलशीराम घरत यांच्या पदाचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.

पाटील म्हणाले की, मी जिल्हाधिकारी यांना रीतसर पत्र लिहून निदर्शनात आणून दिले की सरपंच माधुरी पाटील यांचे पती माजी उपसरपंच अनिल पाटील यांनी 85/1सरकारी गुरुचरण जागेत 2014 रोजी दोन मजली हाॅटेल,टायर विक्री चे दुकान,कार्यालय असे पक्के बांधकाम केले आहे.तसेच सर्व्हे नं.८५/१ या सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमणबाबत आमदार मनोहर भोईर यांनी देखील दि.२७/७/२०१६ रोजी तारांकीत प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानूसार या जागेचा पंचनामा मंडळ अधिकारी पोयंजे, तलाठी सजा , पोलिस पाटील आष्टे व ग्रामसेवक कसळखंड यांनी दहा पंचांच्या समक्ष पंचनामा केला असता सदर अतिक्रमण बांधकामास कोणत्याही प्रकारची कर आकारणी केली नव्हती तसेच घरमंजुरी अर्जं अशी कोणतीही कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे जमा केली नव्हती.हे बांधकाम माजी उपसरपंच अनिल पाटील यांच्याच नावावर होते.परंतु ग्रामसेवकाने खोटे दस्तऐवज तयार करून ते पंचनाम्यानंतर सख्खे चुलते गोविंद बालकृष्ण पाटील यांच्या नावे केले असल्याचे उचड झाले होते.याप्रकरणी रायगड जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून माधुरी अनिल पाटील यांचे सरपंच पद, उपसरपंच रंजना राम नाईक, सदस्य रोहित तुलशीराम घरत यांचे सदस्यपद बरखास्त करण्याचे आदेश मंगळवार दिनांक 9 मार्च रोजी दिले आहे.

याशिवाय अनंता पाटील यांनी पत्रकार परिषदेत सरपंच माधुरी यांचे पती अनिल पाटील यांच्या अन्य भ्रष्टाचारी कारनाम्यांचा बुरखा टराटरा फाडला. ते म्हणाले की यांनी ग्रामपंचायती हद्दीमध्ये इतकी दुर्दशा मांडली आहे की गावाचे सगळे रस्ते खड्डेमय झाले आहेत, हाय मास्टर दिव्यांचे बिल थकल्यामुळे त्याचे मीटर तोडून नेले आहे. गावात पथदिव्यांची सोय नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात गावातले रस्ते काळोखाने भरलेले असतात. इतकेच काय तर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये साधे ग्रामपंचायत कार्यालय नाही. प्राथमिक शाळेच्या एका खोलीमध्ये ग्रामपंचायतीचे कार्यालय थाटून बसावे लागत आहे.

ग्रामपंचायत हद्दीमधील कंपन्यांनी सारेच्या माध्यमात न केलेल्या कामांची कंत्राटे सरपंच महोदयांच्या नातेवाईकांना दिली जातात. त्यामुळे गावातील नागरिकांच्या हक्काच्या पैशाचा अपहार करणाऱ्या या भ्रष्टाचारी सदस्यांच्या निलंबनाने जरी आम्ही समाधानी असलो तरी सुद्धा त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.

कसळखंड ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य असून सरपंचाची निवड थेट पद्धतीने झाली होती. आताशा थेट सरपंचाची निवडणूक न होता ती सदस्यांच्या मधून केली जाते. त्यामुळे सदस्यत्व रद्द झालेल्या प्रभागांमध्ये येथे पुन्हा निवडणूक होईल. त्यानंतर सरपंच पदाच्या प्राप्त आरक्षणानुसार नऊ सदस्यांमधून सरपंच निवडला जाण्याची शक्यता आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.