महिला लेखिकांच्या साहित्याची अभिवाचनस्पर्धा संपन्न
श्रीनिवास काजरेकर
पनवेल दि. १४ः
संस्कार भारती, पनवेल समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिला लेखिकांच्या साहित्य अभिवाचन स्पर्धेची अंतिम फेरी संपन्न झाली. ही स्पर्धा ‘कलाभारतीयम’ च्या फेसबुक पेजवर संपन्न झाली. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला. राज्यभरातून अनेक स्पर्धकांनी यात आपला सहभाग नोंदवला. दापोली, जि.रत्नागिरी येथील मिलिंद जोशी यांनी प्रथम क्रमांक, वैशाली भिडे यांनी द्वितीय आणि प्रीती पंडित यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. प्रिया जोशी, वर्षा ओगले व प्रदीप बर्गे याना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
माणिक जाधव व पत्रकार श्री. मधुसूदन पत्की यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षकांनी यावेळेस पनवेल समितीच्या या अभिवाचन स्पर्धेच्या निमित्ताने महिला लेखिकांचे साहित्य, अभिवाचनात कायिक व वाचिक अभिनय याचे महत्त्व, प्रकाश संगीत इत्यादी घटकांचा अंतर्भाव याबद्दल उपयुक्त मार्गदर्शन केले. तसेच अभिवाचनाबद्दल नवीन पिढीत होणाऱ्या जागरूकते बद्दल आनंद व्यक्त केला. अभिवाचनाच्या अधिकाधिक कार्यशाळा घेण्यात संस्कार भारती पनवेल समितीने पुढाकार घ्यावा याबद्दल उत्तेजन दिले व होणाऱ्या कार्य शाळांसाठी सहकार्याची तयारी दर्शविली. संस्कार भारती पनवेल समितीने सर्व विजेत्यांना विविध प्रकारची वाचनीय पुस्तके पारितोषिकाच्या स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहेत.








Be First to Comment