नविन चित्रपटांच्या लॉन्च आणि रिलीजच्या सतत होणाऱ्या घोषणांतुन हे स्पष्ट आहे की, कोविड-१९ च्या जागतिक महामारीच्या या कठिण काळातही भारतीय चित्रपट समुदायातील लोक सक्रिय राहिले. टाळेबंदीमुळे संपूर्ण जग ठप्प पडले असताना मिळालेल्या फावल्या वेळात भावी काळातील तयारीचे नियोजन त्यांनी केले. याच कारणाने सिनेमागृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू झाल्यामुळे, कोरोनावरील लस आल्यामुळे आणि थोडाफार प्रमाणात चित्रपटांचे शुटिंग सुरु झाल्यामुळे उत्साहित झालेल्या चित्रपट निर्मात्यांनी आपल्या नविन चित्रपटांच्या लॉन्च आणि रिलीजच्या तारखांच्या घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. महामारीमुळे कोरड्या झालेल्या मनोरंजनाच्या मैदानात या घोषणांच्या पावसामुळे दर्शकांसाठी लवकरच चित्रपटांचे पीक बहरेल. महत्त्वाचे म्हणजे यावेळी ओटीटीच्या रुपाने नवीन बटाईदार सुद्धा उपस्थित असेल.
मागिल वर्षी पन्नास टक्के क्षमतेने चित्रपटगृहे चालवण्याची परवानगी मिळाल्यानंतरही चित्रपट बाजारात हालचाल झाली नाही. चित्रपटगृहे तर सुरु झाली मात्र दर्शक व चित्रपटांची तंगी राहिली. आता मात्र स्थिती सामान्य होताना दिसत आहे. मागिल महिन्यातच चित्रपट क्षेत्रातील अग्रगण्य प्रॉडक्शन कंपनी यशराज फिल्म्सने २०२१ मध्ये रिलीज होणा-या आपल्या पाच चित्रपटांच्या रिलीजच्या तारखांची घोषणा केली आहे. यासोबतच आप-आपल्या चित्रपटांच्या रिलीजसाठी आतुर झालेल्या चित्रपट निर्मात्यांनी आपल्या नविन चित्रपटांच्या रिलीजच्या तारखा निश्चित करणे सुरू केले आहे. आत्तापर्यंत ७५ चित्रपटांच्या रिलीजच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
रिलीज केलेंडरनुसार अनेक शुक्रवारी छोटे-मोठे चित्रपट येवुन आदळताहेत. याच महिन्यात १२ ते २६ मार्च दरम्यान थोडेथोडके नाही तर तब्बल २५ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आता आपण अंदाज लावु शकतो की या चित्रपटांना थिएटर मध्ये किती प्रेक्षक मिळतील. यातील बहुतांश चित्रपटांमध्ये अपरिचित आणि नवीन कलावंत आहेत. काही चित्रपट जस ‘रूही’ ( राजकुमार राव आणि जान्हवी कपुर ), ‘संदीप और पिंकी फरार’ (अर्जुन कपुर आणि परिनीती चोपडा ),’मुंबई सागा’ (जॉन अब्राहम) मध्ये ओळखीचे आणि लोकप्रिय चेहरे आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांच्या उपस्थितीवरुन पूढे काय स्थिती बनेल हे निश्चित होईल. तरी सुद्धा निर्माते बेधडकपणे आपल्या चित्रपटासोबत रांगेत उभा आहेत.
एप्रिल नंतर थिएटर मध्ये प्रेक्षकांची संख्या वाढेल ही आशा दाखवली जात आहे कारण प्रेक्षकांच्या मोठया संख्येला कोरोनावरील लस दिली गेली असेल. यावर्षी या आशेचा पहिला संकेत पोंगलच्या मुहुर्तावर रिलीज झालेल्या तामिळ अभिनेता विजयचा चित्रपट ‘मास्टर’ च्या वेळीच मिळाला होता. कोरोनाच्या आगमनापासुन अनेक चित्रपट थिएटर ऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत होते. विजयला सुद्धा आपला चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा सल्ला देण्यात आला होता. विजयने मात्र आपल्या प्रशंसकांचा उत्साह पाहुन ‘मास्टर’ ओटीटी ऐवजी थिएटर मध्ये रिलीज केला. विजयचा हा आत्मविश्वास काम करुन गेला. या चित्रपटाने पहिल्या दोन आठवड्यातच २५० कोटीहुन अधिक कमाई केली. यासोबतच थिएटर आणि इंटरनेट रिलीज मधील अंतर कमी करत हा चित्रपट तीन आठवड्याच्या आतच ओटीटीवर रिलीज झाला. यापूर्वी ‘शादी मे जरुर आना’ च्या निर्मात्यांनी हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला होता तेंव्हा थिएटर मालकांनी या चित्रपटाचे शो कमी केले होते. ‘मास्टर’ पासुन थिएटर मालकांची दादागिरी आता संपली आहे.
नव्या स्थितीमध्ये गुंतवणूक व नफा लक्षात घेऊन निर्माता, थिएटर मालक व ओटीटी प्लॅटफॉर्म यांच्यामध्ये समजदारी विकसित होत आहे. थिएटर मध्ये रिलीज झालेल्या मागिल काही चित्रपटांवरुन असे दिसुन आले आहे की, सामान्य दर्जाचे चित्रपट पहायला प्रेक्षक थिएटर मध्ये जायला आता तयार नाहीत. महामारीच्या काळात ओटीटीच्या अनिवार्यतेने प्रेक्षकांची आवड बदलली आहे. देशी-विदेशी चित्रपट, वेब सिरीज आणि शो पाहिल्याने त्यांचा दृश्यानुभाव आणि समजदारीचा विस्तार झाला आहे. केवळ चित्रपट आणि टिव्ही शो वरील प्रेक्षकांची मनोरंजनासाठीची निर्भरता आता संपली आहे. ते आता व्हरायटी पाहत आहेत. प्रेक्षकांची बदललेली आवड आणि प्रवृत्ती पाहुन नेटफिलक्सने नुकतच ४१ चित्रपट आणि शोजच्या निर्मितीची घोषणा केली आहे. यात १३ चित्रपट, १५ वेब सिरीज, ६ कॉमेडी शो, ४ डॉक्युमेंट्री आणि ३ रिअॅलिटी शो आहेत.
भावी काळात मनोरंजन व्यवसायातील उल्लेखनीय वाटा ओटीटीकडे असेल. मागील काही महिन्यात सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या सब्सक्राइब्रसची वाढलेली संख्या याचा पुरावा आहे. नेटफिलक्सच्या अधिकृत घोषणेच्यावेळी उपस्थित चित्रपट निर्माता करण जोहरने स्पष्ट रुपात सांगितले की, दर्शक आता केवळ भव्य चित्रपट आणि इव्हेंटसाठी थिएटर मध्ये जातील. चित्रपटाचा प्रचार आणि मिळालेल्या माहितीवरून प्रेक्षक आता चित्रपट पहायला थिएटर मध्ये जायच की ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याच्या येण्याची वाट पहायची हे ठरवतील. तिकडे ओटीटी प्लॅटफॉर्म ओरिजिनल कंटेंटच्या रुपात चित्रपट खरेदी करने आणि स्ट्रीम करने सुरु ठेवेल. नेटफिलक्सद्वारा घोषित १३ चित्रपटांपैकी अधिकाधिक चित्रपट हिंदी आहेत आणि त्यात कार्तिक आर्यन आणि तापसी पन्नू सारखे लोकप्रिय कलाकार आहेत. या चित्रपटांचे निर्माता चित्रपट इंडस्ट्रीचे नियामक आहेत यावर लक्ष देणे गरजेचे आहे. करण जोहरने धर्मा प्रॉडक्शनचा चित्रपट ‘ मिनाक्षी सुंदरेश्वर’ च्या बाबतीत सांगितले की, ही एक प्रेम कहाणी आहे. सुरुवातीला थिएटर चित्रपटाच्या धर्तीवर या चित्रपटाची प्लॅनिंग झाली होती मात्र आम्हाला हे जाणवलं की, प्रेक्षक आता थिएटर मध्ये जावुन प्रेम कहाणी बघणे पसंद करत नाहीत. त्यामुळे आम्ही आमचा निर्णय बदलला. निर्माते सुद्धा आता प्रेम कहाणीवर आधारित चित्रपट बनवत नाहीयेत.
हिंदी चित्रपटांच्या दृष्टीकोनातून हा एक महत्वपूर्ण विधात्मक काळ आहे. आपण सर्वांना हे माहित आहे की, दशकांपासून हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य रुपात प्रेम कहाण्याच चालत आल्या आहेत आणि ऐतिहासिक संदर्भात त्यांची प्रगतीशील सामाजिक भुमिका सुद्धा राहिली आहे. कोविड-१९ नंतर हळू-हळू खुलणा-या भारतीय समाजात २०२१ हे वर्ष चित्रपटांच्या दृष्टीने प्रयोग आणि परीक्षणाचे वर्षे राहिल. चित्रपट आणि मनोरंजनाच्या प्रती प्रेक्षकांचा व्यवहार बदलला आहे. निर्माता-दिग्दर्शक अधिक दक्ष झाले आहेत. ते दर्शकांच्या बदलत्या अभिरुचीला प्रभावित करण्याच्या प्रयत्नात आहेत. संक्रमण आणि परिवर्तनाच्या या काळात ही चिंता सुद्धा होत आहे की, भारतीय चित्रपटांची भारतीयता आणि स्थानियता लुप्त तर होणार नाही ना ? जागतिक होण्याच्या प्रयत्नात आपण आपल्या स्थानिक क्षमता आणि ताकद गमावुन बसणार नाही ना?
-सुरेश मंत्री
संपर्क – ९४०३६५०७२२








Be First to Comment