स्त्रीशक्ती…..
वसुंधरा म्हणजे धरणीमाता जशी समस्त जीवसृष्टीला तिच्या कवेत सामावून घेते, त्याचप्रमाणे प्रत्येक स्री ही कुटूंबातील सर्वांना ममतेने सांभाळते..सगळ्यांची काळजी घेत..कुणाचे स्वभाव चांगले असो वा वाईट..पण मनात कितीही राग असला तरी फार काळ तो टिकवून न ठेवता विसरून जाते, आणि सगळ्या कुटूंबाला मोठ्या मायेने, प्रेमाचा ओलावा अबाधित राखून एकत्र बांधून ठेवते. ही आहे एक भारतीय भावनाशील स्री..! बरोबर ना सख्यांनो ?
जीवाला जीव देणारी, आपुलकीने वागणारी ती आहे जणू वात्सल्यमुर्ती,
ती कधी भासते एखाद्या स्वच्छ झुळझुळ वाहणाऱ्या नदीसारखी ….!
कुणाचे स्वभाव व विचार चांगले असोत वा नसोत..सगळ्यांशी नातं जोडत राहते, टिकवून पण ठेवते.
आपल्या संस्कृतीत मातृदेवता समजल्या जाणाऱ्या स्रीला निसर्गाने एक अद्भुत शक्ती बहाल केली आहे. जी कधी भावनेच्या भरात येवून तर कधी वेळप्रसंगी कठोर निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात असते. म्हणूनचं तर तिला आदिशक्ती म्हणून संबोधले जाते. तेजस्वी,आत्मविश्वासू ,आत्मियता ,व आत्मभान ठेवूनच ती सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवत असते.
अनेक पुरुष प्रधान क्षेत्रात कार्यरत असणारी , हसतखेळत सगळ्यांशी जुळवून घेण्याची कला तिच्यात असल्यामुळे, त्या कलेचा अविष्कार वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ती मोठ्या आत्मविश्वासाने उलगडत असते.
ती असते एखाद्या शांत तेजस्वी समईतल्या वातीसारखी, स्वतः ला कितीही चटके बसत असले तरीही इतरांना प्रकाश देणारी..तेही निस्वार्थपणे…!
आणि हो…त्याचबरोबर आजच्या तरुण पिढींचे विचार व जुन्या संस्कृती चालीरीतींना बॅलेन्स करणं पण तिला छान जमत बरं..! त्यांची योग्य ती सांगड घालत, जुन्या संस्कृतीचा मान ठेवून , नव्या विचारांचा देखील ती सन्मान करते.
आधुनिक स्री विषयी अजून एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते , ती अशी कि, आजच्या आधुनिक काळातील स्री ही लग्नानंतर एक पाऊल पुढे जात..
समाजातील अनाथ व गरीब कुटुंबातील मुलांना दत्तक घेवून त्यांचे पालक म्हणून बालसंगोपन करत लहानाचे मोठे करतात…त्याचबरोबर त्यांना उच्चशिक्षण व संस्कार देवून स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी मानसिक व आर्थिक पाठबळ पण देतात. हे खुप प्रशंसनीय आहे.असा नवा अविष्कार घडवणारी ही आहे एक भारतीय नारी..!
गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटात घरातील प्रत्येक स्रीने कुटूंबाची ढाल होवून लढा दिला..ही आहे एक धाडसी रणरागिणी..!!
सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक क्षेत्रात स्रीने डिजिटल माध्यमाचा बारकाईने अभ्यास केला व ती आता सहजपणे हा व्यवहार करत.. प्रगतीची उंच भरारी घेत..ती आहे या स्मार्ट युगातील स्मार्ट गृहिणी…! बरोबर ना ? प्रत्येक संघर्षावर मात करत, जिंकणारी ती एक सक्षम व आत्मनिर्भर स्री..!
तर सख्यांनो मला या दिवशी तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते कि, प्रत्येक स्रीने या महिला दिनाच्या निमित्ताने एक संकल्प करावा..इतरांची काळजी तर तुम्ही घेताचं , पण आता स्वतः चे आरोग्य, छंद, व नियमित व्यायाम करत , स्वतः ची काळजी घ्यावी. स्वतःला वेळ द्यावा, आवडीनिवडी जपतच आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने घालवावा..मग सांगा घेणार ना स्वतःची काळजी ?
स्रीशक्ती लाभलेल्या माझ्या सख्यांना महिला दिनाच्या खुप खूप शुभेच्छा व नमस्कार..🌹🌹🌹🙏🙏
मानसी जोशी, खांदा कॉलनी







Be First to Comment