बदलत्या युगात वासुदेवाचे स्वर होत काळाच्या पडद्याआड
सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।
वासुदेव आला हो, वासुदेव आला, सकाळच्या पहारी हरिनाम बोला!’ हे गाणे कानावर पडले की पहाटे गाव जागविणारा वासुदेव आठवतो. गळ्यात कवड्याच्या ,मण्यांच्या माळा, अंगावर रंगीबेरंगी कपडे, दोन्ही हातात तांब्याचे कडे, हातामध्ये चिपळ्या, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे आणि डोक्यात मोरपिसाची टोपी असा हा आपलासा वाटणारा वासुदेव पूर्वी सकाळी घरोघरी फिरत होता. मात्र आता वासुदेव लुप्त होण्याच्या मार्गावर असून त्याचे दर्शन दुर्मिळच झाले आहे.
समाज प्रबोधन घडविणारे लोक कलाकार आता संगणक युगात लुप्त झाले आहेत. ग्रामीण भागात वासुदेवाचे महत्व विशेष होते. परंतु आता त्याचे मुळात दर्शनच दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे वासुदेव आला हो, वासुदेव आला हे स्वर कानी पडतच नाहीत. कृष्णाचा अवतार मानल्या जाणार्या वासुदेवाला संगणक युगात थारा नाही हे तितकेच खरे. शहरातून नव्हे तर खेड्यातूनही हा वासुदेव हद्दपार झाला आहे. भात कापणी झाली की वासुदेव घरोघरी जाऊन धान्य मागायचा, बच्चे कंपनी वासुदेवाच्या आवाजाने पहाटे उठून त्याच्या मागे फिरायची, ती मजा काही औरच होती. ‘वासुदेव हरी वासुदेव हरी सकाळच्या पहारी आली वासुदेवाची स्वारी’ अशी गाणी म्हणत आपल्या दोन्ही हातातील चिपळ्या वाजवत अभंग म्हणत वासुदेव धान्य मागत होते.
वासुदेव ही पिढय़ान पिढ्या चालत आलेली एक परंपरा आहे. मात्र, ही परंपरा टिकविण्यासाठी सध्या कोणीही धजावत नाही.शहरीकरणात फ्लॅट संस्कृतीमुळे वासुदेवाला इमारतीत प्रवेश मिळत नसल्याने शहरातून तर तो केंव्हाच हद्दपार झाला आहे.मात्र आता गावाकडे वासुदेवाला पाहून मान सन्मान दिला जात आहे.आजही भारतीय संस्कृती जोपासली जात आहे.








Be First to Comment