Press "Enter" to skip to content

विठ्ठल नगर, कर्जत येथील माऊली सोसायटीचा अभिनव उपक्रम

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे माणसामाणसातील अंतर वाढल्याने आरोग्याचे, सुरक्षिततेचे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले. एकमेकांचा संपर्क होत नसल्यामुळे कुणीही कुणाच्या सुखदुःखात सहभागी होऊ शकले नाही. त्यामुळे विठ्ठल नगर कर्जत येथील माऊली को. ऑप. हौ.‌ सोसायटीचे जेष्ठ सदस्य व सल्लागार आत्माराम निघोजकर ह्यांच्या संकल्पनेतुन सोसायटीतील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली व विठ्ठल नगर मधील कोरोना महामारीच्या संकट काळात ज्यांनी जीवाची पर्वा न करता सामाजिक कार्य केले त्या व्यक्तींचा आदर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल नगर विभागाचे नगरसेवक बळवंत घुमरे, नगरसेविका संचिता पाटील, माजी नगरसेवक संतोष पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली.‌ त्यानंतर सोसायटीतील दिवंगत सदस्या वैकुंठवासी ह.भ.प. जिजाबाई शंकर साळोखे, कै. सुरेखा प्रभाकर प्रभुणे तसेच कै. प्रभाकर विनायक प्रभुणे ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सोसायटीतील सदस्यांकडुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहुन त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती सांगण्यात आली.

तसेच विठ्ठल नगर परिसरातील कोरोना महामारीच्या संकट काळात जीवाची पर्वा न करता समाजातील तळागाळातील तसेच गरजुंना सहाय्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला. विठ्ठल नगरचे रहिवासी तथा परिसरातील तसेच समाजातील समस्या आपल्या लेखणीतून मांडुन त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले निर्भिड पत्रकार संजय गायकवाड ह्यांचा माऊली सोसायटी परिवारातर्फे कोरोना योद्धा म्हणुन पुष्पगुच्छ व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला तसेच डॉ. सुप्रिया म्हामुणकर, सामाजिक कार्यकर्ते व माऊली सोसायटीचे सचिव प्रभाकर गंगावणे ह्यांचाही सोसायटी तर्फे कोरोना योद्धा म्हणुन सत्कार करण्यात आला.

पत्रकार संजय गायकवाड यांनी आम्ही जे काही काम केले ते आमचं कर्तव्य होतं कारण, पत्रकारीतेमध्ये समाजात ज्या घटना घडत असतात त्या घटना वर्तमानपत्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतो तसेच कोविड योद्धा आम्ही नाही तर आपण सर्वच जण आहोत कारण, आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेतली म्हणुन आपण कोरोना सारख्या महामारीस रोखु शकलो, शासकीय यंत्रणा, समाजसेवक तसेच प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी जसे खारीचा वाटा उचलावा तशा प्रकारचे काम सर्वांनी एकजुटीने केले. त्यामुळे कोरोना महामारी आटोक्यात आली असे त्यांनी ह्यावेळी सांगितले.

प्रमुख पाहुणे नगरसेवक बळवंत घुमरे यांनी माऊली सोसायटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासंर्दभात प्रतिक्रिया देताना म्हटले की, मागील पंधरा वर्षांच्या नगरसेवक काळात असा कार्यक्रम कुठल्याही रहिवासी सोसायटीने केलेला आठवत नाही, सोसायटीतील निधन झालेल्या वयोवृद्ध व्यक्तींना श्रद्धांजली वाहुन माणुसकीचे दर्शन घडल्याचे जाणवले तसेच कोरोना काळात सामाजिक काम केलेल्यांचा कोरोना योद्धे म्हणुन केलेला सत्कार अविस्मरणीय आहे, प्रत्येक रहिवासी सोसायटीने असे कार्यक्रम साजरे करायला हवेत असे मत त्यांनी ह्यावेळी व्यक्त केले.‌

माऊली सोसायटीतील रहिवाशी राजेंद्र साळोखे, शरद साळोखे, प्रशांत प्रभुणे हे सोसायटीने आपल्या दिवंगत आई वडिलांना श्रद्धांजली वाहिल्यामुळे गहिवरून गेले. त्यांनी माऊली सोसायटीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आत्माराम निघोजकरयांनी केले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शेखर तथा आबा देशमुख, बाळासाहेब अहिरराव, अरुण निघोजकर, लक्ष्मण सोनावणे, नितीन चवरे, सुनंदा अहिरराव, कुसुम गंगावणे,कुंदा निघोजकर, शकुंतला श्रीखंडे,सुशिला बघे,नलिनी साळोखे, ऋतुजा प्रभुणे आदि सदस्य उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.