आफ्टर ऑल मराठी इज माय मदर टंग
काल मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. वि वा शिरवाडकर यांचे फोटो टाकून शुभेच्छांचे बॅनर सोशल मीडियावर इकडून तिकडे फिरत होते. शिरवाडकर आणि कुसुमाग्रज हे दोघेही एकच हे कित्येक मराठी बांधवांना कालच कळले.
मराठी माध्यमांच्या शाळांना फाट्यावर मारून आपल्या अपत्यांना इंग्रजी माध्यमात शिकायला पाठवणाऱ्यांनी सुद्धा मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकून ठेवण्यासाठी काय काय केले पाहिजे यावरती मनमोकळे भाष्य केले.
खरेतर हे स्वगत कालच्या मुहूर्तावर लिहायचे होते पण म्हटले किमान एक दिवस थांबून लिहूया.तसेही काल व्यक्त झालेल्या बहुतांश प्रभुतिंच्या पैकी कित्येक जण एकदम नेक्स्ट इयर ला उगवतील,त्या आधे मध्ये कुणीतरी भाषेसाठी लिहिलेच पाहिजे…हा विचार सुद्धा होताच.
मराठी भाषा दिन होतो न होतो तोच मराठी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या अग्रणी च्या पाच वृत्तपत्रांपैकी दोन वृत्तपत्रांमध्ये पानभर छापून आलेल्या जाहिरातीने उद्विग्न केली. एकीकडे मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकवून ठेवण्यासाठी, भाषा संवर्धनासाठी आणि मराठी भाषेवर होणाऱ्या अन्य भाषांचे आक्रमण थोपविण्यासाठी काय करावे याचे ज्यांनी आदल्या दिवशी पानभर लेख छापले. त्याच वृत्तपत्रांच्या मध्ये अप्रस्तुत भाषेतील जाहिराती पाहून वाईट वाटले. परंतु दुसऱ्याच क्षणी मनात हा विचार देखील आला की ज्या वृत्तपत्रांच्या मालकांची नावे दर्डा आणि गोइंका अशी अमराठी आहेत त्यांनी मराठी वृत्तपत्र चालवल्यावर आणखीन वेगळे काय होणार?
सर्वाधिक खपाची, पसंतीची आणि यशस्वी म्हणून गणली जाणाऱ्या मराठी वृत्तपत्रांच्या मालकांचे मराठीपण तपासल्यास ते अभावानेच आढळते. या साऱ्या वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना कदाचित हा लेख वाचून वाईट वाटेल. किंबहुना अस्मादिक “अति शहाणे” या कॅटेगरीमध्ये (मध्ये मध्ये इंग्लिश शब्द लिहिल्याने लेखक मॉडर्न आहे अशी समजायची प्रथा हल्ली रुळू लागली आहे म्हणून मध्ये मध्ये “पुट” करतो….)मोडतो यावर त्यांचे पुन्हा एकमत होईल.
मराठीचा आम्हाला विसर पडला आहे. इत:पर हिचे पांग आम्ही फेडू शकत नाही. एक जिवंत भाषा म्हणून तिच्या संवर्धनाचा, आधुनिकीकरणाचा वसा आम्ही टाकून दिला आहे. भाषा दिन साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील गोष्टी आहेत. इंग्रजी भाषेप्रमाणे सर्व प्रकारचे व्यवहार मराठीतून करणे, त्यासाठी मराठी माध्यमातूनच शिकणे-शिकवणे हे आम्हाला जमणार नाही. आम्हाला स्वत:ची प्रगती करायची आहे; स्वभाषेची नव्हे.
मराठी ही कधीच ज्ञानभाषा होऊ शकणार नाही. जी भाषा शिक्षणाची माध्यमभाषा म्हणून टिकू शकत नाही ती ज्ञानभाषा कशी होणार? मराठी प्रांतिक भाषा म्हणून सुद्धा आगामी काळात टिकणे कठीण आहे. कारण एकतर मराठीमध्ये संवाद साधणं कमी होत चाललंय. माध्यम ही भाषेचा आरसा असतात. आणि त्याच अग्रणी च्या माध्यमांमध्ये जर का भाषेचा दर्जा घसरू लागला तर ती भाषा कशी काय टिकणार?
प्रत्येक समाजाला स्वभाषेविषयी प्रेम असते. पण ते प्रेम ती भाषा जगण्याला उपयोगी पडते व भौतिक प्रगतीच्या आड येत नाही तोवरच टिकून असते. आपण आपली भाषा सोडतो ती अन्य भाषेविषयी प्रेम वाटते म्हणून नव्हे तर आपली भाषा आपणास आर्थिक संधी पुरवण्यात कमी पडते म्हणून.आजच्या काळात इंग्रजीची उत्तम जाण हवीच. आणि शाळा इंग्रजी असली तरी घरी मराठीचे संस्कार करता येतातच की.पण प्रश्न पालकांच्या आणि मुलांच्या दोघांच्याही मानसिकतेचा आहे. उत्तम इंग्रजी बोलता येणे किंवा किमान तसा अभिनय करता येणं हे मॉडर्न पर्सनॅलिटी असल्याचे आयाम बनले आहे.
ज्यांना मराठीची स्थिती वाईट आहे हे मान्य आहे त्यांच्या मनातही नेमके काय केले म्हणजे ही स्थिती बदलेल याविषयी स्पष्ट रूपरेषा नाही.भाषेचा विकास ही व्यक्तिगत किंवा स्वेच्छाधीन बाब असू शकत नाही, म्हणूनच सरकारनामक शिखर संस्थेला त्या कामी प्रमुख भूमिका पार पाडावी लागेल.अन्यथा आफ्टर ऑल मराठी इज माय मदर टंग म्हणण्याची वेळ फार दूर नाही.







Be First to Comment