Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांनी केली नेणवलीच्या प्राचीन लेण्यांची स्वच्छता

राजीप कोंडी धनगरवाडी शाळेतील लहानग्यांचा लेणी संवर्धनाचा ध्यास

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।

सुधागड तालुक्यातील राजीप कोंडी धनगरवाडी शाळेतर्फे नेणवली येथील प्राचीन लेण्यांवर नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्राचीन नेणवली लेण्यांची माहिती घेऊन संवर्धनासाठी पुढाकार घेतला.

     शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खैरे यांनी या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. सर्वांनी मिळून लेणी, सभागृह, स्तूप व सभोवतालचा परिसर स्वच्छ केला. त्यानंतर राजेंद्र खैरे यांनी मुलांना लेण्यांची माहिती दिली व त्यांच्या संवर्धनाचे महत्व सांगितले. त्यानंतर एकत्र जेवण देखील केले. पुन्हा एकदा परिसर स्वच्छ करून शाळेत परतले.

प्राचीन नेणवली लेणी

खडसांबळे व नेणवली गावाजवळ सह्याद्री पर्वतात नेणवली लेण्या आहेत. लेण्याचा मार्ग या दोन्ही गावापासून खरबाच्या वाटेने घनदाट अशा डोंगरांमध्ये जातो लेणी गावापासून साधारण अडीच किमी अंतरावर आहेत व येथील जंगल राखीव वनक्षेत्र आहे. तसेच कोंडी धनगरवाडी गावातून देखील लेण्यांवर पोहचता येते हा मार्ग चांगला आहे. येथूनच कोंडी धनगरवाडी शाळेतील विद्यार्थी लेण्यांवर गेले होते. अतिशय दुर्गम असलेल्या या लेणी समूहात एकूण 21 लेण्या आहेत. 

      लेण्यांतील सर्वात मोठ्या सभागृहाच्या मागच्या बाजूस उंच व मोठा घुमट आहे. घुमट दगडांमध्ये व्यवस्थित कोरला आहे. घुमटचा व्यास 1.5 मीटर उंची 3.5 मीटर आहे. घुमटाच्या अगदी वर मध्यभागी झाकणासारखा आकार असून चौरसाकृती छिद्र आहे. स्थानिक लोक या घुमटाला रांजण म्हणतात. या लेण्यातील सभागृहे सर्वात मोठे लेणे आहे. याचा दर्शनी भाग कोसळला असला तरी छत सुरक्षित आहे. महाराष्ट्रातील अतिविशाल सभागृहांमध्ये याचा समावेश होतो. हे सभागृह 21 मीटर बाय 16 मीटर एवढे विशाल आयताकृती आहे. या सभागृहाचे डाव्या बाजूस व मागील भिंतीत एकूण 17 खोल्या खोदलेल्या आहेत. प्रत्येक खोलीत दगडी ओटा आणि चौकोनी खिडकी आहे. काही खोल्या एकांतवासासाठी खोदल्या आहेत. सभागृहांमध्ये ठाणाळे लेण्यांप्रमाणे नक्षीकाम नाही किंवा लेण्याचा काळ ठरवण्यासाठी शिलालेख नाही. सभागृहाच्या पुढील बाजूस पाणी साठवण्याचे बंदिस्त टाके आहे. लेण्यांमध्ये काही ठिकाणी भिंतीस लागून शयन कोठे बांधले आहेत. व भिंतींमध्ये कोनाडे ठेवण्यात आले आहे. लेणी समूहात एकूण अकरा लेणी असली तरी मुख्य सभागृह व त्याच्या बाजूकडील सदनिका वगळता काही ठिकाणी लेणी कोसळली आहेत. काहींच्या भिंती तुटल्या व कोसळल्या आहेत. काहींची अर्धे छत कोसळले आहे. तर एका ठिकाणी प्रांगणाचा भाग कोसळला आहे. हजारो वर्षाचा ऊन-पावसाच्या माऱ्यामुळे वरच्या भागातून दगड कोसळत आहेत. 

     

आपल्या प्राचीन व सांस्कृतिक ठेव्याची माहिती मुलांना व्हावी, व त्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. परिणामी हे लहान विद्यार्थीच लेण्यांचे व ऐतिहासिक ठेव्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पुढे सरसावतील. 

राजेंद्र खैरे, मुख्याध्यापक, कोंडी धनगरवाडी शाळा

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.