सिटी बेल लाइव्ह / विचार कट्टा #
श्रावण महिन्याआधी येणाऱ्या
‘दीप अमावास्या’ या सुंदर नावाने पाळल्या जाणाऱ्या सणाला गेल्या काही दशकांत ‘गटारी’ अशा बीभत्स शब्दाने ओळखले जाऊ लागले.
अनेक दुर्गुणांप्रमाणे अलिकडे मद्यपानालादेखील प्रतिष्ठा दिली गेली. तरूण वर्ग याला विशेष बळी पडत आहे. हा वर्ग शौर्याचा पूजक असतो. शिवाजी महाराजांचा तर नि:स्सीम चाहता व भक्त असतो.
याचे दु:ख होते की, मद्यपान आणि इतर कोणत्याही मादक द्रव्यांच्या व व्यसनांच्या सक्त विरोधात असलेल्या शिवाजी महाराजांना या तरूणांबाबत काय वाटले असते.
शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातील मजकूर जसाच्या तसा येथे देत आहे.
महोत्सवामध्ये आपण बसते जागी नृत्यगायनादी न करविता बाहेरल्याबाहेर मजलसींत करवावे. स्वतां नाही तोंच बरे. काही एक आसक्ती जाहल्याने चित्त आवरीन म्हणता आवरले जात नाही. तेव्हा व्यसन प्राप्त होऊन राजकार्ये अंतरतात. किंबहुना आणखीही यामुळे दोष घडतात. याकरिता कोणी एक अशी दुर्व्यसनाची संभूति होऊ देऊ नये.
भोजन, उदकपान यांचा समय नेमून त्यांस अन्यथा होऊ न द्यावे.
- * * उन्मत्त द्रव्य सर्वथैव भक्षू नये, जवळील लोकांस भक्षू देऊ नये.** *
तरुणांनी आत्मचिंतन करावे. या व्यसनांचा व मटणाच्या आसक्तीचा गैरफायदा राजकारणी विविध प्रकारे न घेतील तर नवल. उदा. ते जनतेला लुटुन मिळवलेल्या गडगंज पैशातुन नाक्यानाक्यावर पाचपंधरा हजार फेकतात. परिणाम, तरूण त्यांचे मिंधे होतात. मग हा राजकारणी विभागातील सार्वजनिक भूखंड गिळंकृत करतो, त्यातुन शेकडो कोटी रू. करतो किंवा इतर काही गैरप्रकार करतो. पण तरूणांमधे विरोधाची क्षमता उरलेली नसते. याचे प्रतिबिंब निवडणुकीतही उमटते. जनतेला लुटणाऱ्यांना निवडुन आणण्यासाठी हे तरूण काम करताना दिसतात.
सात्विकता व नैतिकतेबाबत गांधीजी आणि शिवाजी सारखेच होते. एक महिना आत्मसंयम पाळण्यावर एक दिवस मोकाट वर्तन व बीभत्सपणा करण्याने पाणी फिरते. श्रावणाचे पावित्र्य नष्ट होते आणि समाज अधोगतीला जातो.
दीप अमावास्येला सुसंस्कृत वर्तन करूया.
धन्यवाद,
आपला
अॅड. गिरीश राऊत
निमंत्रक : भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ
Be First to Comment