समाजात वावरत असतांना आपले व्यक्तिमत्व दोन पायांवर उभे असते ते प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे देखील... यातील आपले स्वतःचे पाय जे आयुष्यभर मैलोनमैल चालत असतात तर दुसरे पाय म्हणजे प्रेरणा जी आपले हे पाय योग्य दिशेची आपल्या चालण्यास वाट दाखवीत असतात. घरात बालपणी *संस्काराचे च्यवनप्राश* मिळाले की व्यक्तिमत्त्वाची बलदंडता अंगी संचारते. माझ्यावर समाजात मिसळण्याचे आणि त्यात समाजाचे काही अंशी देणे फेडण्याचे संस्कार माझ्या आईने केले तर समाजात नेमके कार्य करण्याचा अपघात परळच्या डॉ.बोर्जीस रोड पद पथाच्या निकट वास्तूत झाला... 1990 च्या दिपावलीत वयाच्या 21 व्या वर्षी टाटा नावाच्या मंदिरात अपघातानेच प्रवेश झाला पण तेथेच रुग्णसेवेची ज्योत मनात प्रज्वलित झाली. *त्या तीन घटना* आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची प्रेरणा मनात जागवून गेल्या.
1990 रोजी माझी पहिली प्लेटलेटची बॅग मी स्वतः सिस्टर बरोबर रुग्णाला जेंव्हा त्याच्या रुममध्ये द्यायला गेलो तेंव्हा त्याचे अक्रोषित होऊन ओघळणारे अनावर अश्रू मला अंतर्मुख करुन गेले.. god bless u my child. हे वाक्य आजही रात्रीच्या नीरव शांततेत ऐकू येतात. आणि रक्तदाते घडविण्याची प्रेरणा मनात जागृत करतात.
दुसरे प्रकरण टाटाच्या कॉरिडॉर मध्ये तरुण मुलाला मांडीवर घेऊन पोथी वाचीत असलेली त्याची आई… नुकतेच त्या तरुणास B.A.R.C त नोकरी लागली होती आणि हे संकट ओढवले होते. यातून केवळ उपचार नाही तर श्रद्धा ही तितकीच महत्वाची असते हे उमजले. तिसरे प्रकरण त्यावेळी माझ्याच वयाची असलेली मुलगी दोन दिवस वेटींग एरियात बसलेली ही तिसऱ्या दिवशी ज्यावेळी तिला वॉर्डात सलाईन लावलेले पाहिले तेंव्हा पायाखालची जमीन सरकली. तिच्या वडिलांच्या आजारपणाचा मी कयास बांधीत होतो. आजाराचे संकट कोणावरही ओढवू शकते यावेळी धडधाकट व्यक्ती पुढे आल्या पाहिजेत हे शिकलो.
नंतर या प्रवासात असंख्य अनुभव माझे जगणे समृद्ध करुन गेले. रुग्णसेवेचा खरा ट्रिगर त्यावेळीच जो ओढला गेला. आज माझ्या जगण्यावर मी समाधानी आहे. मी जर अपघाताने टाटाला प्लेटलेट द्यायला गेलो नसतो तर आज कदाचित घरकोंबडा बनून राहिलो असतो. अश्या या विलक्षण अपघाताचे माझ्यावर अनंत उपकार आहेत..!
असे हवेहवेसे अपघात असंख्य व्हावे यातून अनेक रक्तदाते आणि रुग्णमित्र निर्माण व्हावेत..!
🙏🏻
- रुग्णमित्र प्रसाद अग्निहोत्री, वाशी, नवी मुंबई
Be First to Comment