Press "Enter" to skip to content

कल्याण नगरीत रस्ते सुरक्षा अभियानात यमराजाची गांधीगिरी

यमराजाने दुचाकीस्वारांना गुलाबाचे फुल देऊन समजावले हेल्मेटचे महत्व

सिटी बेल लाइव्ह । ठाणे – कल्याण ।

रस्ते अपघातास आळा बसावा तसेच नागरिकांत वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने यंदा १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान राज्यभरात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येणार असून या अभियानांतर्गत परिवहन विभाग, वाहतूक पोलिस, खाजगी तसेच सरकारी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व अन्य सरकारी विभागांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षेसाठी विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. याच अभियानाअंतर्गत वाहतूक पोलीस विभाग कोळशेवाडी, कल्याण पूर्व व स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने  हेल्मेट वापरत नसलेल्या  दुचाकी स्वारांसाठी साक्षात यमराजाने गांधीगिरी करीत कल्याणमधील वेगवेगळ्या चौकात नियम न पाळणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन जनजागृती केली.

यावेळी  कोळशेवाडी वाहतूक शाखा कल्याण (पूर्व) येथील  वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ , सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ चौधरी व स्टार सिटी हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण भुजबळ उपस्थित होते.  दुचाकिस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे,चारचाकी चालविताना सिट बेल्ट लावणे,वेगावर नियंत्रण ठेवणे, रस्त्यावर वाहन उभे न करणे,दारु पिऊन वाहन न चालवणे,वाहन चालविताना मोबाइलवर न बोलणे,दुचाकी वाहनांवर ट्रिपल सीट प्रवास न करणे याबाबत माहिती देऊन वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबत माहिती उपस्थित नागरिकांना दिली.

राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरो, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या २०१९ च्या आकडेवारी नुसार भारतामध्ये रस्ते अपघातात १,५१,११३ नागरिक मरण पावले आहेत, भारतामध्ये दर तासाला १७ नागरिक रस्ते अपघातात मरण पावतात त्यामुळे वाहतूक नियमांचा हात धरायचा की यमाला साथ द्यायची  हे ठरविणे आपल्या हातात आहे अशी माहिती स्टारसिटी मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ प्रवीण भुजबळ यांनी दिली. कल्याण पूर्व येथील चक्की नाका, पत्री पूल चौक, काटेमनवली नाका, लोढा पलावा सर्कल येथे यमाचा पेहराव घातलेल्या माणसाने शेकडो नागरिकांचे प्रबोधन केले. कल्याण शहरातील वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे. वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी तसेच किरकोळ अपघातही होत आहेत.

कल्याण शहरातील रस्त्यांच्या कडेला अस्ताव्यस्त पद्धतीने वाहने पार्क केली जात असल्यानेही या समस्येत भर पडली आहे. सध्या रस्ते काँक्रीटीकरण सुरु असल्याने वाहतूक विस्कळीत होत असून नागरिकांनी नियम पाळून  वाहतूक विभागाला सहकार्य करावे असे आवाहन कल्याण पूर्व येथील वाहतूक विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.