ध्वज तिरंगा
आनंदनिधान ध्वज तिरंगा उंच उंच गगनी
हिरे माणके कोटी ज्योती ओवाळू त्यावरूनी
सांगतो कथा तो शूरवीर योद्ध्यांची
किती अनाम गाथा गणती नाही त्यांची
इतिहास जागता नररत्नांचा लिहिला पानोपानी
भारत भूमी संतांची जपली मानवता
संस्कारातून संदेशातून दिसे एकरूपता
जरी वेगळी आम्ही लेकरे भारत भू जननी
नवरंगाची निसर्गसृष्टी नटली राने वने
दऱ्याखोऱ्या अथांग सागर वसुंधरेचे देणे
आशिष देई शुभ्र हिमालय कैलासावरूनी
देशोदेशी सन्मानाने राष्ट्रध्वज मिरवितो
किर्तीवंत भाग्यवंत भारत होऊन जातो
शान वाढे विश्वामध्ये आनंद दाटे मनी
सुवर्णकांती शुभ प्रभाती मंगल दिन उगवला
अमृतवर्षी राष्ट्रध्वज डौलाने फडकला
उन्नत माथा होतो अमुचा त्रिवार वंदन चरणी
सुजाता खरे, नवीन पनवेल
Be First to Comment