रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे युनिट मध्ये भरघोस पगारवाढ देणारा करार करण्यात कामगार संघटनांना यश
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे युनिट मध्ये ऑक्टोबर, २०१८ पासून प्रलंबित असलेला कायम कामगारांचा वेतन वाढ करार करण्यास येथील सहा कामगार संघटनांच्या कामगार संघटना फोरमला यश आले आहे. या वेतनवाढ करारामुळे रिलायन्सच्या नागोठणे युनिट मधील कायम कामगारांचे किमान वेतन ५० ते ५५ हजार तर कमाल वेतन १ लाखांच्या वर गेले आहे.
या कराराची मुदत नोव्हेंबर, २०२३ पर्यंत असून कंपनीतील १०५० कायम कामगारांना लागू होणाऱ्या या करारामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
रिलायन्सच्या लर्निंग सेंटर मध्ये ११ जानेवारी, २०२० रोजी संपन्न झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात रिलायन्स व्यवस्थापनाच्या वतीने नागोठणे युनिट अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, अखिल भारतीय औद्योगिक संबध विभागाचे प्रमुख धनंजय चौगले, एच.आर. विभागाचे प्रमुख चेतन वाळंज, विनय किर्लोस्कर, नेत्रानंद स्वेन, निलेश दांडेकर, उदय दिवेकर व कामगार संघटनांच्या वतीने कामगार नेते साधुराम मालुसरे, विकास खांडेकर, अरुण कुथे, जनार्दन शेळके, सखाराम घसे, लक्ष्मण खाडे, चंद्रकांत भोय अरुण करंडे, संजय पाटील, सुनील मोकल, दयाराम पाटील व सुहास कुथे यांनी सह्या केल्यानंतर या करारावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळी कामगार नेते दीपक रानवडे, विकास चवरकर, प्रवीण गांगल, मारुती दांडेकर, महेंद्र पाटील व सुभाष खराडे हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते.
या वेतनवाढ कराराची माहिती देण्यासाठी रिलायन्सच्या निवासी संकुलातील इस्टेट ऑफिसमध्ये मध्ये शुक्रवारी (दि.२२) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कामगार नेते साधुराम मालुसरे यांनी सांगितले की, रिलायन्स कारखान्यात श्रमिक सेना या मुख्य कामगार संघटनेसह पेट्रोकेमिकल एम्प्लॉईज युनियन, कोकण श्रमिक संघ, भारतीय कामगार सेना, पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन व महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना एकत्रितपणे कामगार फोरमच्या माध्यमातून वेतनवाढ कराराच्या वाटाघाटीसाठी कामगारांचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यामुळेच रिलायन्सच्या बडोदा व दहेज युनिट पेक्षा मूळ वेतनवाढ व बदलता महागाई भत्ता यांसह इतर सर्वच बाबतीत सर्वोत्तम व अधिक फायदे देणारा असा वेतनवाढ करार करण्यात आला आहे.
या करारामुळे कायम कामगारांच्या मूळ वेतनात सरासरी ३८ टक्के वाढ झाली आहे. तर बदलता महागाई भत्ता ९ ते दहा हजारांनी वाढणार असल्याने एकत्रित वेतनवाढ ही २० ते २१ हजारापर्यंत होणार आहे. या कराराची थकीत रकमेपोटी कामगारांना किमान अडीच लाख ते कमाल साडेचार लाख रुपये मिळणार आहेत. कामगारांना २.७ टक्के दराने वार्षिक वेतनवाढ होणार आहे. ऑल इंडिया कन्झुमर प्राईज इंडेक्स प्रमाणे महागाई भत्ता सुरु राहणार असून अन्य भत्त्यांमध्येही वाढ झाली आहे. दरमहा रु. २७५० ची फूड कुपन्स सुरु राहणार असून त्यावर उत्पन्न कर सवलत मिळणार आहे. कामगारांना प्रतिवर्षी ६१ हजार बोनस मिळणार आहे. निवृत्ती नंतर कामगाराला पुढील दोन वर्षे ओ.पी.डी. व आय.पी.डी.(हॉस्पिटलायझेशन) वैद्यकीय सुविधा सुरु राहणार आहे. ६० वर्षांनतर कामगार व त्याच्या पत्नीला प्रत्येकी पाच लाख रुपयांची वैद्यकीय उपचार पॉलिसी मिळणार असून निवृत्ती नंतरही आकर्षक निवृत्ती पॅकेज मिळणार आहे. या करारातही यापूर्वीच्या कामगारांना ये-जा करण्यासाठी बस सुविधा, मुलांना १२ वी पर्यंत मोफत शिक्षण, कुटुंबाला अमर्यादित मेडिक्लेम सुविधा यांसह पूर्वीच्या इतर सेवाशर्ती कायम ठेवण्यात आल्या असल्याचे साधुराम मालुसरे यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षभरात संपूर्ण जग कोरोनाच्या संकटातून जात असतांनाच बहुतांश उद्योगांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. अशा कठीण परीस्थितही रिलायन्स व्यवस्थापन व कामगार संघटना फोरमला हा वेतनवाढ करार करण्यात यश आले. यासाठी श्रमिक सेनेचे संस्थापक, लोकनेते गणेश नाईक, अध्यक्ष संजीव नाईक यांचे भरीव मार्गदर्शन तसेच रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन व सहकार्य यामुळे हा यशस्वी करार आम्ही करू शकल्याचे मालुसरे यांनी आवर्जून सांगितले. याशिवाय कामगार फोरम मध्ये नसलेले परंतु निलंबित झालेल्या कामगारांनी आम्हाला कधीही सांगितले तरी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना सहकार्य करू. तसेच येथील ८० टक्के कामगार हे स्थानिक असून आमची बांधिलकी भूमिपुत्रांशी व स्थानिकांशी असल्याचेही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस कामगार फोरमसह भूमिपुत्र महासंघाचे सर्व पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे आभार प्रदर्शन कामगार प्रतिनिधी विजय शहासने यांनी केले.








Be First to Comment