खालापूर तहसीलवर शेतकरी मोर्चा : आमदार जयंत पाटील यांचा दलालांवर हल्ला बोल
सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।
शेतक-यांना देशोधडीला लावण्यात दलालांचा मोठा हात असून छत्तीशी भागातील औद्योगिक वसाहतीला विरोध नसून मूळ शेतक-याला योग्य मोबदला मिळावा हि प्रमुख मागणी असल्याचे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यानी खालापूरात शेतकरी मोर्चाला संबोधताना सांगितले.खालापूर तहसील कार्यालयावर मंगळवारी तालुक्यातील छत्तीशी भागातील शेतकरी धडकले.
खालापूर फाटा ते नगरपंचायत कार्यालय पर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.नगरपंचायत कार्यालयाजवळ मोर्चाचे सभेत रूपातंर झाले.बैलगाडीतून आणि वारकरी वेशभूषेतील शेतकरी मोर्चात सामील होवून टाळ गजरात मोर्चा काढण्यात आला होता.
तालुक्यातील छत्तीशी भागातील नारंगी, तोंडली,स्वाली ,चिलठण,आपटी,खरिवली, गोठीवली, करंबेली, नंदनपाडा, गोहे या गावात शासनाने औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यासाठी दोन हजार एकर जमिनीचे संपादन करण्यात येत आहे.शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर औद्योगिक वापरासाठी शिक्के मारले गेले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या शासनाकडून ऐकले जात नसल्याने शेतकऱ्यांनी आपले म्हणणे शेकापचे चिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या कानावर घातले होते.

औद्योगिक वसाहत जाहिर होण्या अगोदर दलाला मार्फत शेतकऱ्यांकडून मागील काही वर्षापूर्वी मुंबई, पुणेसह अन्य शहरातील धनिकांनी अल्प दराने जमीन खरेदी केली आहे त्या जमीनीचे आज करोडो रूपये त्यांना मिळणार आहेत.याशिवाय संपादित करण्यात येणा-या जमीनी सुपीक लागवडी खाली असल्याने शेतकरी शिल्लक राहणार नसल्याने शेतक-यांनी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलवर मोर्चा काढण्यात आला.शेतक-याना संबोधताना आमदार जयंत पाटील यानी विकासाला विरोध नसल्याचा पुर्नच्चार केला.शेतकरी बांधवाना संपादित क्षेञाच्या 25टक्के विकसित भूखंड मिळावा,प्रति गुंठा सात लाख रूपये भाव,भूमिपूञाना नोकरीचे लेखी आश्वासन तसेच ज्या शेतक-यांच्या जमिनी अगोदरच धनिकानी विकत घेतल्या आहेत त्याना शासनाकडून मिळणा-या मोबदल्यातील पन्नास टक्के वाटा मिळावा या आग्रहि मागण्या असल्याचे जयंत पाटील यानी सांगितले.
यावेळी खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांची आमदार जयंत पाटील आणि शेतक-यांच्या शिष्टमंडळाने भेट घेत बुधवारी भूसंपादनासाठी होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली.भूसंपादना अगोदर गावोगावी ग्रामसभेच आयोजन करण्याच्या सूचना तहसीलदाराना आमदार पाटील यानी केले.मोर्चाला खालापूर तालुका चिटणीस संदिप पाटील,नगरसेवक संतोष जंगम, किशोर पाटील,कयूम पाटील,अविनाश तावडे,दिनेश गुरव,खालापूर नगरपंचायत उपनगराध्यक्षा शिवानी जंगमसह शेतकरी शांताराम पाटील, अशोक पाटील, मिलिंद दाभोलकर, जनार्दन खरिवले, राजू पाटील, परशुराम पाटील, सुरेश पाटील आदी बाधित शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतक-यांसाठी पहिला सत्याग्रह माझ्या आजोबानी रायगड मध्ये केला होता.आजहि शेतकरी कामगार पक्ष शेतक-यांच्या पाठीशी ठाम आहे.शेकाप विकासाला विरोध करणारा पक्ष नसून शेतक-याना त्यांचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे यासाठी लढा देत आहे.दलालांना दूर ठेवून चर्चा व्हायला पाहिजे यासाठी खालापूरला आलो.या अगोदर देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंञी असताना औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादना विरोध करताना माझी भूमिका त्यांच्या समोर मांडली होती.
आमदार जयंत पाटील शेकाप सरचिटणीस









Be First to Comment