पेण बँक हे प्रकरणी सनदी लेखापाल विक्रम वैद्य यांचे वक्तव्य
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
'पेण बँक हे प्रकरण खूप गुंतागुंतीचे आहे. 27 प्रकारचे गुन्हे यामध्ये समाविष्ट आहेत. आज मितीस 611 कोटी रुपये ठेवीदारांना देणे असले तरी बँके कडील जप्त केलेल्या जमिनींची किंमत आठशे ते हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. आपण आत्तापर्यंत संचालकांना शिक्षा झाली पाहिजे. अशा अन्य विषयांवर आपण लक्ष केंद्रित केले होते मात्र पैसे कसे मिळणार ? याबद्दल आपल्याला दिशा मिळत नव्हती. आता आपण योग्य दिशेने जात आहोत. पेण, अलिबाग येथील न्यायालयात असलेत्या केसेस ईडीच्या न्यायालयात गेल्या पाहिजेत. त्यांचा हस्तक्षेप दूर झाल्यास ठेवीदारांचे पैसे निश्चित मिळतील.' अशी माहिती सनदी लेखापाल विक्रम वैद्य यांनी दिली.
पेण अर्बन बँक संघर्ष समितीची बैठक अंबामाता सभागृहात मोहन सुर्वे, प्रदीप शहा व नगरसेवक बळवंत घुमरे यांनी आयोजित केली होती. समितीचे सचिव चिंतामण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात 'आपली समिती गेली दहा वर्षे ठेवीदारांचे पैसे मिळावेत म्हणून लढा देत आहेत. आता अंतिम टप्प्यात लढा आला आहे.
नवीन अध्यदेशाप्रमाणे पाच लाखाचा विमा झाला आहे मात्र आपल्यावर हे संकट फेब्रुवारी 2012 चे असल्याने आपल्याला केवळ एक लाख रुपयांचे संरक्षण मिळणार आहे. अन्यथा आपला प्रश्न बऱ्याच अंशी सुटला असता.' असे स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर सभेचे अध्यक्ष शिरीष बिवरे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, नगरसेवक बळवंत घुमरे, धनंजय देशमुख, प्रदीप कदम आदी उपस्थित होते.
वैद्य यांनी माहिती सांगताना, 'आपले 140 कोटी रुपये दुबईत हवाल्यात गेले. 18 कोटी रुपयांना गुजरातमध्ये घेतलेली कंपनी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. 13 कोटी रुपयांचे फर्निचर केले आहे. विविध बोगस कंपन्यांची खाती उघडून पैसे काढले आहेत पण आपल्यासाठी वाईटातून चांगली गोष्ट म्हणजे आपल्या पैशांतून जमिनी विकत घेतल्या म्हणूनच त्या विकून आपले पैसे परत मिळू शकतील. नवी मुंबई मध्ये असलेली 35 एकर जमीन विकण्याची परवानगी मिळाल्यास तिची किंमतच 753 कोटी रुपये मिळू शकते आणि ठेवीदारांचे पैसे 611 कोटी आहेत. मात्र ईडी कडे सर्व केसेस गेल्यावर त्यातून मार्ग निघेल. आपल्या पैशांतून 166 एकर जागा घेतल्याचे उघड झाले आहे. मी त्यासाठी विना मोबदला काम करीत आहे. त्याला निश्चित यश येईल आणि लवकरच याचा सोक्षमोक्ष लागेल असे आशादायक चित्र आहे.' असे सांगितले.
सुनील पाटील यानी, 'सहकार विभागाचे सहकार्य आपल्याला निश्चितच लाभेल त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.' असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात शिरीष बिवरे यांनी,'खासदार सुनील तटकरे यांच्यामुळेच ठेवीदारांचे पैसे मिळतील असा विश्वास असल्याने मी त्यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर तसेच राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क करून आपला विषय सकारात्मक केला आहे आणि तातकरेच यातून मार्ग काढतील अशी खात्री आहे. आपल्या बँकेचे पुनरुज्जीवन होईल किंवा एखादी सक्षम बँकेमध्ये या बँकेचे विलीनीकरण होऊ शकते. त्यासाठी आपण एकत्र असले पाहिजे.' असे स्पष्ट केले.
पेण, अलिबाग येथील न्यायालयातील केसेस ईडीच्या कोर्टात नेण्यासाठी एकमताने ठराव करण्यात आला. याप्रसंगी सभागृह खचाखच भरले होते.








Be First to Comment