रणगाड्यामुळे अलिबागप्रमाणेच रायगडची देखील शान वाढेल
आ. जयंत पाटील यांचे गौरवोद्गार
सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । धनंजय कवठेकर ।
भारतीय लष्करा मध्ये भीमपराक्रम करणारा हा रणगाड्यामुळे अलिबागप्रमाणेच रायगडची देखील शान वाढेल असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. भारतीय लष्करातील पराक्रमाची यशोगाथा सांगणार्या टी 55 या भव्य रणगाड्याचे आ. जयंत पाटील यांच्या हस्ते शानदार लोकार्पण करण्यात आलेे.
युवावर्गाला लष्करात भरती होण्यास प्रोत्साहन ठरणार्या या रणगाड्याचे जवळून दर्शन घेण्यासाठी अलिबागकरांसह ठिकठिकाणाहून नागरिक तसेच पर्यटकांनी हजेरी लावली होती. नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि टिम अत्यंत दिमाखदार तेवढाच शिस्तबद्ध कार्यक्रम घडवून कौतुकास पुन्हा एकदा पात्र ठरली.
यावेळी तत्कालिन जिल्हाधिकारी तथा कल्याण मनपाचे आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, माजी आमदार पंडित पाटील, रायगड पोलिस अधिक्षक अशोक दुधे, टी 55 रणगाडयावर प्रत्यक्षात सेवा बजावलेले निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन उमेश वाणी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रघुजी आंगे्र, लान्स नायक सुधीर पाटील, गजेंद्र दळी, प्रविण ठाकूर, उपनगराध्यक्षा अॅड मानसी म्हात्रे, नगरसेवीका चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील, मुख्याधिकारी महेश चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी कर्मचारी व नागरीक, पर्यटक उपस्थित होते.
सुरुवातीला आ. जयंत पाटील यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते रणगाडयाच्या कोनशिला आणि लोकार्पण करण्यात आले. तर रणगाडयाची माहिती फलकाचे अनावरण पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रायगड पोलिस बँड पथकाच्या देशभक्तीपर सुरेल गितवादनाने वातावरण भारुन गेले होतेत्र
यावेळी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील म्हणाले की, अलिबाग शहराचा चौफेर विकास करण्यात आला आहे. फक्त डे्रनेजचे काम शिल्लक आहे. वाढीव एफएसआयमुळे शहराच्या विकासातदेखील वाढ होत आहे. पर्यटन दृष्टया जास्तीत जास्त विकास काम होत असून नगरपरिषदेच टिम चांगले काम करीत आहे. विकासाची उंची वाढवून ती कायम ठेवली असल्याचे गौरवोद्गार देखील त्यांनी यावेळी काढले. अधिकारी जनता आणि लोकप्रतिनिधी यांचे संबंध चांगले राहीले तर काय होऊ शकते याचे हे उदाहरण असल्याचेही ते म्हणाले. आंग्रे समाधीस्थळावर ध्वनी प्रकाश योजनेचे काम पुर्णत्वास न्यायचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ विजय सुर्यवंशी यांनी आपल्या भाषणात रायगडकरांच्या जिव्हाळ्याबद्दल आभार मानले. आजचा चांगला दिवस निवडल्याचे सांगतानाच येणारे पर्यटक एक चांगली आठवण घेऊन परततील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नाताळ आणि शासक दिवसाच्या शुभेच्छा देतानाच आजपासून लागू होणार्या संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.
मावळ्यांचा जिल्हा असणार्या रायगडमध्ये सैन्यात कमी संख्येने प्रवेश घेत असल्याबद्दल खंत व्यक्त करतानाच हा रणगाडा प्रेरणा देऊन लष्करभरतीला प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तर कॅप्टन (नि) उमेश वाणी यांनी रणगाडयाविषयी माहिती देताना त्याची विजयगाथा अलिबागकरांसमोर उभी केली.
या कार्यक्रमात नुकतीच बदली झालेल्या अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश चौधरी यांच्या विशेष कामगिरीबद्दल आ. जयंत पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत नगराध्यक्ष प्रशांत नाईक व उपनगराध्यक्षा अॅड मानसी म्हात्रे यांनी केले. सुत्रसंचलन, प्रस्तावना तसेच आभारप्रदर्शन गटनेते प्रदीप नाईक यांनी केले.









Be First to Comment