खार गांधे सह 11 गावच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गेलं इंडिया कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कल्पनाताई पाटील प्रयत्नशील
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
सन २००८ मध्ये गेलं इंडिया कंपनी कडून चुकीच्या कामाच्या पद्धतीमूळे तालुक्यातील खार गांधे , चोळे , अटिवली , मुंढाणी , जांभुळटेप , तरशेत , शेतजुई . झोतिरपाडा , बेणसे , कोलेटी , व पालखार असे एकूण ११ गावांच्या शेतीचे पूर्ण पणे नुकसान झाले. गेलं कंपनी कडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
कल्पनाताई पाटील यांनी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत भुरे यांच्या समवेत नुकतीच मुंबई मंत्रालय येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी संपर्क करून खासदार अरविंद सावंत व माजी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांची भेट घेऊन याप्रश्नी शेतकऱ्यांना जलद न्याय मिळवून देण्याची विनंती केली, याबरोबरच उद्योग विभागात झालेले बैठकीचे निर्णय व इतिवृत्त गेलं कंपनीला देण्यासाठी प्रयत्नशील राहून अनंत भुरे हे एमआयडीसी पनवेल सह सर्व मंत्रालयीन कामकाजाचा पाठपुरावा घेत आहेत. न्यायासाठी शेतकऱ्यांचा अनेक वर्ष संविधानिक व सनदशीर मार्गाने लढा सुरू आहे.
अशातच या कामी विलंब होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक पावित्रा घेतला. शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी अनंत देविदास भुरे यांनी शेतकऱ्यांसमवेत आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या दालनात, गेलं प्रशासन व शेतकऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना जलद नुकसान भरपाई मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.









Be First to Comment