सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
मार्च २०२० मध्ये कोरोनाने अनेक ठिकाणी शिरकाव केला. अनेक जण कोरोना ग्रस्त झाले. तेव्हापासून सुरक्षितता म्हणून प्रत्येक जणाच्या तोंडावर मास्क लावलेला असायचा. मास्क नसेल तर दंडही आकारला जात होता. ऑक्टोबर २०२० मध्ये काही प्रमाणावर कोरोनाची भीती कमी झाली. मात्र काही ठिकाणी अद्यापही कोरोनाचे रुग्ण अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आढळत आहेत. त्यामुळे बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी आलेल्या असंख्य नागरिकांच्या तोंडाला मास्क नसतो.
कोलाड,रोहा,धाटाव येथील बाजारपेठा नेहमी अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गजबजलेला असतात. या बाजारपेठेत येणाऱ्या निम्म्या व्यक्तींच्या तोंडाला मास्क नसतो. आता कोरोनाची भीती काहींना राहिलेली नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दंडात्मक कारवाईचा बडगा नसल्यामुळे काही नागरिक बेफिकीरपणे वावरताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे काही दुकानदार, मासळी विक्रेते,फळांच्या गाड्या हे सुद्धा मास्क नलावता बिनधास्तपणे मालाची विक्री करताना दिसत आहेत. रस्त्याने प्रवास करणारे, दुचाकीवर जाणारे सुद्धा काही जण मास्कचा वापर करत नाहीत.
जणू काही कोरोना पूर्णपणे हद्दपार झाला आहे या अविर्भावात काहीजण वावरताना दिसत आहेत. मात्र अनेक दवाखान्यांमध्ये मास्क,सेनिटायझर यांचा वापर काटेकोरपणे होत असल्याचे दिसून आले आहे. मोबाईलवर कोरोना पासून बचाव करण्यासाठी मास्क आणि सेनिटायझरचा वापर अत्यावश्यक असल्याचे सुरुवातीलाच सांगितले जाते. मात्र काही जण त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे आढळून आले आहे. मस्छी मार्केट,भाजी मार्केट यामध्ये खरेदी करणाऱ्यांची गर्दी असते. मात्र सोशल डीस्टनचे नियम पाळले जात नाहीत. कोरोना काळात ज्या गोष्टी नागरिक भीतीने काटेकोरपणे पाळत होते तसे काही ठिकाणी आता दिसत नाही.
जो पर्यंत कोरोनाची भीती पूर्णपणे जात नाही तोपर्यंत नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे जरुरीचे आहे. आपला त्रास दुसऱ्या व्यक्तीला होणार नाही याचीही दक्षता बाळगणे तितकेच आवश्यक आहे.








Be First to Comment