प्रताप सरनाईकांनी नरवीर तानाजी मालुसरेंप्रती केलेल्या चुकीच्या विधानाबद्दल उमरठ वा सिंहगडला नतमस्तक होऊन माफी मागावी
सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर ।
नरवीर तानाजी मालुसरेंसारखा धारातिर्थी पडणारा मी सोळाव्या शतकातील मावळा नाही. आ.प्रताप सरनाईक 21 व्या शतकातील मावळा असून धारातिर्थी पडणारा नाही, अशा आशयाची वक्तव्यं इडीच्या चौकशीनंतर आ.प्रताप सरनाईक यांनी करून तमाम नरवीरप्रेमींच्या भावना दुखावल्याबद्दल आ.सरनाईकांनी नरवीर तानाजी मालुसरेंप्रती केलेल्या चुकीच्या विधानाबद्दल उमरठ वा सिंहगडला नतमस्तक होऊन माफी मागावी अन्यथा राज्यात देशात सर्वत्र तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, असा खणखणीत इशारा तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरीटेबल ट्रस्ट उमरठचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी दिला.
आ.सरनाईकांचा नरवीरभूमी उमरठ येथून निषेध करीत आठवडाभराची मुदतही दिली आहे. याप्रसंगी तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरीटेबल ट्रस्ट उमरठचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्यासमवेत उत्सव समितीचे उपाध्यक्ष शिवराम मालुसरे, जयराम मोरे, रामदास कळंबे, अनिल ज्ञानोबा मालुसरे, सरपंच चंद्रकांत कळंबे, पारमाचीचे सरपंच अनिल मालुसरे, इंद्रजित कळंबे, उमरठचे पोलीस पाटील गणेश कळंबे, कियेचे पोलीस पाटील सुनील मालुसरे तसेच उमरठ, साखर, किये, पारमाची, शिवथर परिसरातील मालुसरे परिवार मोठया संख्येने नरवीरभूमी उमरठ येथे आ.प्रताप सरनाईक यांचा निषेध करण्यासाठी उपस्थित होते.
नरवीर तानाजी मालुसरेबाबत बोलताना प्रताप सरनाईकांना कदाचित इतिहासाचे भान नसेल, छ.शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी अनेक शूरवीरांनी कुटूंबियांवर तुळशीपत्र ठेऊन प्राणांची आहुती दिली. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे हे 1982 साली येऊन नतमस्तक झाले. 350 वर्षांनंतर या उत्सव समितीने जिर्णोध्दार केला, त्यावेळीदेखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी लोकार्पण सोहळयास उपस्थिती दर्शविली.
शिवसेनेची स्थापनादेखील छ.शिवाजी महाराजांच्या मावळयांच्या प्रेरणेतून झाली आहे. आ.प्रताप सरनाईक यांनी त्यांचे वाक्य मागे घ्यावे, अखंड महाराष्ट्रातील मालुसरे परिवार आणि नरवीरप्रेमींनी याठिकाणी या नरवीरभूमीतून संताप व्यक्त करण्यासाठी उपस्थिती दर्शविली, असल्याचे सांगून तानाजी मालुसरे उत्सज्ञा समिती चॅरीटेबल ट्रस्ट उमरठचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी, ज्याप्रमाणे 2014 मध्ये उपाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील मोर्बा येथील कत्तलखाना हटविण्यासाठी आम्ही पहिल्यांदा आवाज उठविला आणि नंतर त्याचे राज्यात देशात सर्वत्र पडसाद उमटले होते. त्याच धर्तीवर हा प्रक्षोभ सर्वत्र पोहोचवू, असा खणखणीत इशारा दिला.
यावेळी उमरठवासियांसह शिवप्रेमी, नरवीरप्रेमी तसेच मालुसरे परिवाराने मोठया संख्येने महिला पुरूष आबालवृध्दांसह उपस्थित राहून आ.प्रताप सरनाईक यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. पोलादपूर तालुक्यातून आ.प्रताप सरनाईकांच्य वक्तव्याविरोधात पहिल्यांदाच असा निर्वाणीचा खणखणीत इशारा दिला गेल्यानंतर आ.सरनाईक यांची भूमिका काय असेल, याकडे तालुक्याचे तसेच नरवीरप्रेमी व शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे.








Be First to Comment