Press "Enter" to skip to content

खासदार म्हणून नाही तर भूमीपुत्र म्हणून मी आंदोलनाच्या सोबत

खासदार सुनील तटकरे यांच्या भेटीने रिलायन्स आंदोलकांच्या आशा पल्लवित

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

भारत सरकारचा आयपीसीएल हा कारखाना या भागात तेव्हा आल्यापासून ते आता उद्योगपतींकडे हा कारखाना जावूनही मी वेळोवेळी येथील प्रकल्पग्रस्त, स्थानिक कामगार यांच्या समस्यां सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने सुरु झालेले हे आंदोलन आपापल्या स्तरावर सुरु होते आणि यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप आपल्याला नको आहे असे मला समजल्यानेच व मला याबाबतीत कोणतेही निवेदन देण्यात न आल्याने मी इकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्याबाबतीत कृपया कोणतेही समाज गैरसमज नसावेत. आज दुपारीच मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसेपाटील यांचा आंदोलन स्थळी येण्यासाठी मला फोन आला. पालकमंत्री ना. आदिती माझी नात आहे असा उल्लेखही त्यांनी यावेळी करून आंदोलनात लक्ष घालण्यास सांगितले. मी कधीही माझ्या आयुष्यात मान-पान पाहिले नसल्याने व या परिसरात सर्वत्र माझे जवळचे संबंध असल्याने या भागाचा खासदार म्हणून नाही तर एक भूमिपुत्र म्हणून मी या आंदोलनाच्या सोबत आहे असे रोखठोक प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले.

नागोठण्यातील रिलायन्स विरोधात कंपनीच्या मटेरियल गेट समोर लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने रिलायन्सचे प्रकल्पग्रस्त व नालीकाग्रस्त यांच्या आपल्या विविध मागण्यांसाठी २७ नोव्हेंबर पासून गेले १७ दिवस चाललेल्या आंदोलनास खा. सुनील तटकरे यांनी भेट दिली. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांसमोर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यावेळी माजी न्यायाधीश बी.जी. कोळसेपाटील, राजेंद्र गायकवाड, राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके, सदानंद गायकर, शिवरामभाऊ शिंदे, मधुकर ठमके, हरीशशेठ काळे, विलास चौलकर, गंगाराम मिणमिणे, शशांक हिरे, चंद्रकांत गायकवाड, रियाज अधिकारी, उदय जवके, हिराजी शिंदे, सचिन कळसकर, संतोष कोळी, विनय गोळे, राजेंद्र शिंदे, सुनील सुटे, अखलाक पानसरे, पप्पू अधिकारी, दिनेश घाग, मनोज टके आदींसह विभागातील सरपंच, प्रकल्पग्रस्त व स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खा. सुनील तटकरे पुढे म्हणाले की, उन, वारा, थंडी, पाऊस याची पर्वा न करता गेले १७ दिवस आपले हे आंदोलन सुरु आहे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनालाही पटत नाही. हा प्रकल्प आला तेव्हा मी रोहा तालुका कॉंग्रेसचा अध्यक्ष म्हणून प्रकल्पाच्या सुरुवातीपासून मी या प्रक्रियेत असल्याने या कारखान्यासाठी भूसंपादन करतांना असलेले त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, नंतरचे मुख्यमंत्री पवार साहेब, नंतर युती सरकारच्या काळात झालेले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात भारत सरकारच्या या प्रकल्पाचे झालेले खासगीकरण या गेल्या २५-३० वर्षांच्या वेगवेगळ्या सर्व बाबतीत माला सर्व माहिती आहे. तेव्हा वेळोवेळी मी माझी भूमिका सातत्याने प्रकल्पग्रस्तांसाठी मांडली आहे. त्यातूनच ६१८ प्रकल्पग्रस्तांना मिळालेली नोकरी हे उदाहरण आहे हे सांगून मागील सर्वच आराखडाच खा. तटकरे यांनी उपस्थितांसमोर सादर केले.

खा. तटकरे म्हणाले की, मी व माझे कुटुंबीय कधीच जनतेपासून दूर राहिलेलो नाही. जनतेत मिसळणारा कार्यकर्ता असल्याने कोरोनाच्या काळातही माझे काम सुरूच राहिल्याने मी स्वताही कोविडचा शिकार झालो. आपले हे आंदोलन सुरु झाल्यानंतर मी या भागातील माझ्या सरपंचांनाही आपल्याला पाठींबा देण्यास पाठविले होते. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असलेले बी.जी. कोळसेपाटील या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. आपण रिलायन्स व्यवस्थापनासमोर नव्या स्वरूपात काय मांडले आहे ते पाहून तसेच व्यवस्थापनाकडूनही आपल्याला काय उत्तर आले आहे आहे याचाही अभ्यास करून याबाबतीत आपण चर्चा करू. वेळ पडल्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगेन व व्यवस्थापनाबरोबर बोलून यातून कसा मार्ग काढायचा याबाबतीत नक्कीच प्रामाणिक प्रयत्न केले जातील असे ठोस आश्वासनही यावेळी खा. तटकरे यांनी दिले.

यावेळी बी.जी. कोळसेपाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले की, खा. सुनील तटकरे आपल्यासोबत आल्यामुळे आपले काम आता सोपे आले असून आता आम्ही या लढ्यात तुरुंगवास, मरण भोगायलाही तयार आहोत. आपण कंपनी बरोबर बोला, आमचे कार्यकर्ते तुमच्या सोबत असतील असेही यावेळी कोळसेपाटील यांनी स्पष्ट केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.