सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू ।
कोवीड 19 मुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुका मुदत संपल्याने प्रशासकीय अधिकारी सांभाळत होते. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीचा फड रंगू लागला आहे. कारण सरपंच ज्यांची वर्णी लागेल त्यांची पाचो उंगली घी मध्ये असणार आहे. त्यामुळे प्रत्येकजण पक्ष हितापेक्षा उमेदवार आपले हित कसे जपले जाईल याकडे जास्त लक्ष देत असल्याने घोडेबाजार आतापासूनच रंगू लागला आहे.
उरण तालुक्यातील चाणजे, नागाव, म्हातवली व केगाव ग्रामपंचायतींसह वेश्वी व फुंडे अशा एकूण 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू होणार आहे. कारण कंपनीमध्ये मिळणार्या करामुळे व कामांमुळे अनेक राजकीय नेत्यांचा पक्षापेक्षा स्वतःचाच जास्त विकास होऊन आज ते मालामाल झाल्याचे चित्र पहावयास मिळते.
उरणमधील ओएनजीसी कंपनी कडून अनेक राजकीय नेतेगण नावारूपाला आले आहेत. त्यामुळे हे वर्चस्व कायम राखण्यासाठी राजकीय गणिते रंगू लागली आहेत. आज कंपनी येऊन अनेक वर्षे झाली तरी प्रकल्पग्रस्त आजही उपेक्षित असून रस्त्यावर उतरत आहे. तर या प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करणारे मात्र मालामाल झाले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. अशा स्वार्थी नेत्यांचे प्रकल्पग्रस्तांवरील व पक्षावरील प्रेम हे बेडगी प्रेम असून ते फक्त आणि फक्त कंपनीकडून मिळणार्या लोण्यावर लक्ष ठेवून आहेत.
आज ओएनजीसी कंपनी येऊन अनेक वर्षे होऊन ही प्रकल्पग्रस्त नोकरी व कामांपासून वंचीत असून राजकीय पक्षांच्या आश्रयाखाली शर्मा, वर्मा नावाचे ठेकेदार बनून मालामाल झाले आहेत. तसेच काही महिन्यापूर्वी 300 ते 350 च्या आसपास ओएनजीसी कंपनीत परप्रांतीय बडेजाव राजकीय नेत्यांच्या चिठ्ठीवर कामाला लागल्याची धक्कादायक माहिती समजते मात्र प्रकल्पग्रस्तांच्या नावाने आजपर्यंत अनेक आंदोलने झाली आहेत. तरीही प्रकल्पग्रस्त उपेक्षित असल्याचे चित्र पहावयास मिळते.
म्हणूनच कंपनी येण्याआधी आपण आपले नेतृत्व करणारे नेते कसे होते आणि आताच्या घडीला कसे आहेत. याचा जरूर विचार करूनच मतदानाचा हक्क बजावावा अन्यथा परिस्थिती अवघड बनणार आहे. कारण मिळणारे लोणी लाटण्यासाठी आतापासूनच प्रत्येकाला सरपंच पदाचे डोहाळे लागले असून त्यासाठी पक्षप्रेम बाजूला ठेवून आपला स्वार्थ असेल त्या पक्षाबरोबर युती आघाडी करून स्वार्थ साधत सरपंच बनण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी सुरू आहे.
तीच गत तालुक्यातील इतर ग्रामपंचायत निवडणुकीत सुरु आहे. कोणत्याही निवडणुकीत मतदारांना आर्थिक रसद पुरवली की बाजी मारता येते हे नेतेमंडळींना माहिती असल्यामुळे निवडणुकीत लाखो रुपयांची खिरापत वाटून ते बाजी जिंकून पाच वर्षात अनेक गैरमार्गाने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून मालामाल होण्याचे एकप्रकारे अस्त्रच बनले असल्याची चर्चा उरण परिसरात सुरू आहे. त्यामुळे उरण तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक इच्छुक राजकीय नेत्यांना पक्ष व स्थानिकांच्या हितापेक्षा सरपंच पदाचे डोहाळे अधिक लागल्याने त्या दिशेने त्यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळते.
याची प्रचिती उरणमधील अनेकांना आलेली आहे. त्यामुळे पक्षाची पदे उपभोगून पक्षाची गद्दारी करून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना फाट्यावर मारणार्या पदाधिकार्यांची वरिष्ठ नेते आरती करतात का उचलबांगडी करण्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतात का याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.








Be First to Comment