शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांचा इशारा
सिटी बेल लाइव्ह । खोपोली । संतोषी म्हात्रे ।
खालापूर तालुक्यातील नारंगी एमआयडीसी मध्ये बाधीत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे निकष लावले जात आहेत. शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारी माझ्याकडे येत आहेत. शेतकऱ्यांना कोणीच वाळी नाही असा कोणाचा समज असेल तर तो अन्याय शेकाप कधीच खपवून घेणार नाही. या भागातील खरिवली, गोठीवली, करंबेली, नंदनपाडा, गोहे आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी नुकताच भाई जयंत पाटील यांची भेट घेतली,आपल्या व्यथा सांगितल्या नंतर शेकाप सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील भलतेच संतापले होते.
ते म्हणाले, या भागातील कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला तर शेतकरी कामगार पक्ष विधानभवनावर मोर्चा काढेल. खालापूर तालुक्यातील नारंगी या भागात शासनाने एमआयडीसीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर एमआयडीसी चे शिक्के मारले गेले आहेत.हे करत असतांना शेतकऱ्यांच्या समस्या किंवा शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले जात नसल्याचे पुढे येत आहे.याबाबत शेतकऱ्यांनी आपले म्हणणे शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या कानावर घातले.
यावेळी आमदार भाई जयंत पाटील हे कमालीचे संतापले होते.भेटीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना आपली व्यथा मांडतांना असे सांगितले की, शेतकऱ्यांकडून मागील काही वर्षापूर्वी मुंबई, पुणे किंवा अन्य शहरातील धनिकांनी अत्यल्प दराने जमीन खरेदी केली आहे त्या जमीनीचे आज करोडो रूपये त्यांना मिळणार असतील तर ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी घेण्यात आल्या आहेत त्यांना आता मिळणाऱ्या मोबदल्यातील थोडा तरी फायदा मिळावा अशी विनंती केली.
शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर योग्य तोडगा काढण्यासाठी लवकरच शेतकऱ्यांच्या घरी एका मिटींगचे आयोजन केले जाईल तेथेच सर्व शेतकऱ्यांचे या बाबतचे म्हणणे ऐकले जाईल असे यावेळी बोलतांना भाई जयंत पाटील यांनी सांगितले.यावेळी शेतकरी शांताराम पाटील, अशोक पाटील, मिलिंद दाभोलकर, जनार्दन खरिवले, राजू पाटील, परशुराम पाटील, सुरेश पाटील आदी बाधित शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment