Press "Enter" to skip to content

ढिसाळ आरोग्य यंत्रणा अजून किती निष्पाप जीवांचे बळी घेणार

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने सर्पदंश झालेल्या महिलेचा करुण अंत

न्यायासाठी उद्धरच्या कदम कुटुंबियांचे पाली प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आमरण उपोषण सुरू

महिलेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी 

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत ।

सुधागड तालुक्यातील पाली प्राथमिक  आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याच्या आरोप करीत याप्रकरणी दोषींवर  कारवाई करावी अशी मागणी कदम  कुटुंबीयांनी लावून धरली आहे. न्यायासाठी मृत महिलेचा मुलगा  प्रदीप अशोक कदम व रोशन कदम  सोमवार दि. (7)पासून पाली प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर उपोषणास बसले आहेत.

माझ्या आईला मरणोत्तर न्याय मिळावा अशी अपेक्षा प्रदीप कदम याने व्यक्त केलीय.  त्यावेळेस कामावर असलेल्या डॉक्टर व वाहनचालक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणी सह आमरण उपोषण सुरू केले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कदम कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

सुधागड तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ व गलथान कारभाराने आजवर अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. अजून किती निष्पाप जीवांचे ही यंत्रणा बळी घेणार असा संतप्त सवाल उपस्थित करित सुधागड  रिपाइंच्या वतीने  या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. याप्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन देखील आरोग्य प्रशासनाने दिले होते.

या घटनेला दोन आठवडे उलटून गेले आहेत,  परंतु संबंधितांवर मागणीच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई न झाल्याने मयत महिलेचा मुलगा व उद्धर ग्रामस्थांनी संविधानिक व शांततेच्या मार्गाने आमरण सुरू केले आहे.  सुधागडातील उद्धर येथील महिला अश्विनी अशोक कदम यांना दि.१५नोव्हेंबर रोजी शेतात काम करीत असताना सर्पदंश झाला. त्यांना उपचारासाठी तात्काळ पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रुती मोरे यांनी वेळीच उपचार केले नाहीत. असा आरोप कुटुंबीयांनी केला. 

दरम्यान अश्विनी कदम यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची १०८ हि रुग्णवाहिका डॉक्टर अभावी अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात एक ते दीड तास उशिरा पाठविण्यात आली. परंतु अलिबाग येथे पोहचेपर्यंत जास्त उशीर झाल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

या घटनेला पाली प्राथमिक केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रुती मोरे व रुग्णवाहिका चालक जबाबदार असल्याचे मृत पावलेल्या महिलेचा मुलगा प्रदीप कदम व उद्धर ग्रामस्थ यांनी सांगितले आहे. दरम्यान सर्पमित्र तुषार केळकर यांनी महिलेला विषारी सर्पाने दंश केला असल्याने तातडीने उपचार मिळणे गरजेचे होते असे मत व्यक्त केले. या प्रकरणातील दोषींवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत  आमरण उपोषण स्थगित करणार नसल्याचे यावेळी उपोषणकर्ते प्रदीप  कदम , रोशन  कदम यांनी  सांगितले. यावेळी रिपाइं सुधागड तालुकाध्यक्ष राहुल सोनावणे , भगवान शिंदे  ,रविंद्रनाथ ओहाळ ,  मनिषा कांबळे ,वंदना शिंदे , रूपेश गायकवाड, आदेश कांबळे,संदेश शिंदे,किशोर डोके,एल डी शिंदे ,मिलिंद शिंदे ,प्रशांत शिंदे ,अशोक कदम,प्रशांत वाघमारे ,अरूण शिंदे  , निशांत पवार, भिम महाडीक ,सिद्धांत गायकवाड ,नरेश शिंदे ,रोहीणी जाधव ,नुतन शिंदे आदी उपस्थित होते.

याप्रकरणाची प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याने उपोषणकर्ते व रिपाइं पदाधिकारी व ग्रामस्थांनी साखळी उपोषण करणार असल्याचे निवेदन सुधागड तालुका आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत मढवी यांना दिले आहे.

          दरम्यान उपोषण कर्त्याना पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्ना वार, पाली पोलीस निरीक्षक  विजय तायडे  , सुधागड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत मढवी यांनी भेट घेऊन चर्चा केली. उपोषणकर्त्यांच्या प्रश्नावर जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ. सुधाकर मोरे व रुग्णवाहिका प्रशासनातील अधिकारी यांनी भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र समाधान न झाल्याने उपोषणकर्ते यांनी चौथ्या दिवशीही आपले उपोषण सुरूच ठेवले.

उद्धर येथील सर्पदंश झालेल्या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर रुग्णास अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पाली प्राथमिक केंद्राची १०८ रुग्णवाहिका काहीवेळ उशिरा आली परंतु तिच्यामधूनच अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. परंतु तेथे एक दोन तासात महिलेचा दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे, या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल.

डॉ शशिकांत मढवी, सुधागड तालुका आरोग्य अधिकारी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.