उरणच्या खोपटा कोप्रोली दरम्यानच्या पावसाळी पाणी निचरा नाल्यात केमिकल सोडले
सिटी बेल लाइव्ह । न्हावा शेवा । अजित पाटील ।
प्रशासनाने अगदी वाऱ्यावरच सोडलेल्या उरणच्या पुर्व भागात अगदी दररोज काहींना काही जीवघेण्या घटना घडू लागल्या आहेत. बुधवारी रात्री ट्रासं इंडिया प्रकल्पात झालेली हजारडस्ट केमिकलची गळतीचे प्रकरण संपते न संपते तोच याच कंपनीच्या अगदी खेटून असलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात घाण आणि उग्र वासाचे केमिकल कुणीतरी सोडल्याची घटना समोर आली आहे. बाजूला असलेल्या ग्लोबीकॉन कंटेनर यार्ड मधून त्यांच्या वेस्ट वॉटर प्रकल्पातून हे केमिकल सोडले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सत्यवान भगत यांनी केला आहे.
या संदर्भात महसूल व प्रदूषण नियंत्रण मंडळाला फोन करून तक्रार केल्यावर महसूलचे कोप्रोली सजेचे तलाठी पिरकर भाऊसाहेब आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जे एन पी टी विभागाचे जनसंपर्क अधिकारी किशोर केर्लेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन केमिकल युक्त पाण्याचे नमुने घेन्याबरोबरच ग्लोबीकॉन च्या ज्या चेंबर मधून हे केमिकल युक्त पाणी नाल्यात आले त्याचीही स्थळ तपासणी केली आहे त्यामुळे आता अधिकारी वर्ग या कंपन्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सत्यवान भगत यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे ग्लोबीकॉन कंपनीचे एच आर मॅनेजर विशाल गावंड हे स्वतः तक्रारदारांच्या सोबत प्रकल्पाच्या बाहेर येऊन स्थळ पाहणी करायला जात असताना कंपनीच्या बाहेरच्या भागात जायला कोणताही रस्ताच सध्याच्या घडीला अस्तित्वात नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली आहे. ज्या ठिकाणी हे पाणी सोडले जात आहे तेथे जाण्यासाठी दुसऱ्या कंपनीच्या आवारातून जाऊन नंतर पाणी निचऱ्याच्या नाल्यावर लाकडी फळी टाकून त्याद्वारे पलीकडे जावे लागल्याची घटना समोर आली असून कंपनीने चारही बाजूने किमान दहा फुटींचा रस्ता ठेवलेला नसल्याची बाब विशाल गावंड यांनी मान्य केली आहे मात्र नैसर्गीक पाणी निचरा नाल्यातीळ केमिकल बाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळेच आता प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी त्यांच्या पेटाऱ्यातून या नाल्यातील असलेल्या केमिकल बाबत कोणता अहवाल काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .
उरणच्या पुर्व भागात वसलेल्या अनेक कंटेनर यार्ड मालकांनी सिडकोकडून ना हरकत दाखला मिळवताना जी कागदपत्रे तिकडे सादर केली आहेत त्यामध्ये कंपनीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शेतीत जायला शेतकऱ्यांना किमान दहा फुटांचा रस्ता चारही बाजूने सोडला असल्याचे सांगून सिडकोचे ना हरकत दाखले मिळवत आहेत. त्यामुळेच एकाही प्रकल्पाने आपल्या प्रकल्पाच्या सभोवताही कोणीही दहा फुटांचा रस्ता सोडलेला नाही ही बाब सातत्याने समोर येत असतानाही प्रशासकीय यंत्रणा मात्र डोळ्यावर पट्टी बांधून कोणतीही कारवाई करायला मागत नसल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. आजच्या सकाळी पहाटे पासूनच ग्लोबीकॉन कंपनीच्या आऊटलेट मधून मोठ्या प्रमाणात केमिकल युक्त पाणी सोडण्यात आल्याने खोपटा कोप्रोली दरम्यानचा पावसाळी पाणी निचऱ्याचा नाला पुर्णतः काळा ठिककर पडला असल्याचे दिसून आले आहे .
या नाल्यात ठिकठिकाणी मासेही मरून गेल्याचे समोर आले आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या ठिकाणी येऊन गेले मात्र त्यांनी केवळ केमिकल युक्त पाणी बाटल्यात भरून घेऊन गेले असले तरीही मृत मासे मात्र निरीक्षणासाठी नेलेले नसल्याची बाब या निमित्ताने समोर आली आहे. तक्रारकर्ते सत्यवान भगत यांनी प्रदूशीत पाण्याचे नमुने घेतले असून ते खाजगी लॅब मधून या पाण्याची तपासणी करणार असल्याचे बोलतांना सांगितले. विषेश म्हणजे ग्लोबीकॉन चे अधिकारी वर्गाने चाल खेळत ज्या नाल्यातून हे केमिकल सोडले होते त्याच नाल्यात शुद्ध पाण्याचा एक टँकरच खाली करीत आपला प्रकल्पाच्या आतील नाला साफ केला आणि तो नाला प्रदूषण नियंत्रण मंडलाच्या अधिकारी वर्गाला दाखवत आमचा नाला सुका टाक असल्याचा दावा करीत आहेत.

त्यामुळे हे केमिकलयुक्त पाणी नक्की कोणी सोडले असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला असून संपूर्ण नाल्याभर पसरलेले हे केमिकल युक्त पाणी नक्की आले तरी कुठून असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणावरून ग्लोबीकॉन कंपनीतून वेस्टज वॉटर बाहेर येत आहे त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात गवत आणि झुडपे वाढली आहेत की नक्की हे पाणी येतंय कुठून हे पाहण्या साठी एका कामगाराला बोलावून तिथली झाडी तोडून ते पहावे लागल्याची घटना घडली आहे. प्रकल्पाचे अधिकारी विशाल गावंड यांनी आता शेतकऱ्यांना रस्ता लवकरात लवकर तयार करणार असल्याची कबुली यावेळी दिली आहे.
बांधपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.विशाखा प्रशांत ठाकूर यांनीही आपले सहकारी ग्रामपंचायत सदस्य संदेश म्हात्रे , देवानंद पाटील , अच्युत ठाकूर आणि पती प्रशांत ठाकूर यांच्यासह घटनास्थळी भेट दिली . प्रशासनाने हे केमिकल या ठिकाणी कुठून आले याची सखोल चौकशी करून दोशींवर कारवाई करावी अशी मागणी बोलतांना केली आहे ! आता प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महसूल खाते नक्की कुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करते की क्लीन चिट देऊन टाकते हे तपासून पाहावे लागणार आहे .
या सर्व प्रकारामुळे आधीच डबघाईला असलेली शेती या केमिकलमुळे नापीक होण्याचा धोका देखील बळावला आहे .








Be First to Comment