Press "Enter" to skip to content

तरच महिलांवरील अत्याचार कमी होतील : संतोष दौंड

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

‘आपल्याकडे पूर्वी पासून पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्यामुळे या आधुनिक युगातही महिलांना दुय्यम स्थान मिळत आहे. त्यांच्यावर अत्याचार होण्याच्या घटना वाढत आहेत. हे रोखण्यासाठी शिक्षण व संस्कार देण्या बरोबरच विचार बदलण्याची आवश्यकता आहे. खरे तर सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने आघाडीवर काम करताताना दिसतात परंतु त्यांना हवे तसे संरक्षण मिळत नाही. त्यांनीही आता स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत त्यासाठी शाळांमध्ये कराटे शिक्षण देणे आवश्यक आहे.’ असे स्पष्ट प्रतिपादन कर्जत पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी संतोष गौंड यांनी येथे केले.

कर्जत शहरातील गुंडगे विभागात असलेल्या गुड शेफर्ड कॉन्व्हेंट स्कूल मध्ये लहान मुलींसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राजवाडा ग्रुपचे संचालक तसेच कर्जत रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील सोनी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाचे उदघाटन करण्यात आले.

बाल सुरक्षा हमारा संकल्प भित्तीपत्राचे प्रकाशन करताना मान्यवर

या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी संतोष गौंड, जेष्ठ पत्रकार विजय मांडे, माजी नगरसेवक दीपक मोरे, बिटमार्शलचे पोलिस कॉन्स्टेबल संदीप घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका एनी थॉमस यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रस्सी जोसेफ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘बाल सुरक्षा हमारा संकल्प’ या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच कोषाणे व पाली येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

सोनी यांनी, ‘मुलींच्या उत्कर्षासाठी कोणताही उपक्रम राबविल्यास त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच कोणत्याही गरीब व गरजू पाच मुलींच्या शिक्षणाची जबाबदरी आपण स्वीकारू.’ असे जाहीर केले. मांडे यांनी आपल्या मनोगतात, ‘अनेकांच्या घरात आजही मुलीचा जन्म झाला तरी नाक मुरडली जातात. पण मुलांपेक्षा मुलीच बऱ्या असे म्हणण्याची वेळ येते. आपण पुरुष प्रधान संस्कृती मानत असलो तरी अनेक घरात आता महिलांचेच राज्य दिसते. त्यामुळे कधी कधी वृध्दांवर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येते. असे होऊ नये म्हणून सासरी गेल्यावर मुलींनी सर्वांना समजावून घेणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले.

मोरे यांनी ‘महिलांना सक्षम करण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.’ असे सांगितले तर घरत यांनी कधीही दामिनी पथक व बिटमर्शलची आवश्यकता वाटल्यास आपल्याशी संपर्क करावा.’ असे सूचित केले. सूत्रसंचालन सपना शिंदे, क्रिस्टिना फर्नांडिस यांनी केले. मनीष भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.