Press "Enter" to skip to content

सुधागडात शासन जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना दणका !

विजयनगर (पडघवली) येथील सरकारी गावठाणातील अतिक्रमणावर प्रशासनाची बेधडक कारवाई

अनधिकृत कंपाउंड व कुंपण हटविल्याने ग्रामस्थांच्या लढ्याला यश ! 

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत ।

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील साईनाथ मित्रमंडळ व पूरग्रस्त ग्रामस्थ, महिला मंडळ विजयनगर (पडघवली) यांनी शासकीय आरक्षित जागा (सार्वजनिक गावचावडी व सार्वजनिक रस्ता) यावरील  अवैधरीत्या केलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली होती.

तक्रारी निवेदनाची दखल घेत प्रशासनाने सदरचे अतिक्रमण हटविण्याची बेधडक कारवाई केली. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशाने व पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्या सूचनेनुसार पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांच्या उपस्थितीत जांभूळपाडा मंडळ अधिकारी श्री हरणे, तलाठी अनंता वारगुडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने अनधिकृत कंपाउंड व तारेचे  कुंपण हटवून जागा खुली करण्यात आली.

या कारवाईने सुधागडात शासन जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना दणका मिळाला आहे. येथील श्रीमती राधिका हेलोंडे व नामदेव हेलोंडे रा.विजयनगर, मौजे पडघवली, ता. सुधागड जिल्हा रायगड  येथील सरकारी गावठाणामध्ये अंतर्गत रस्ता, खुली जागा, व चावडी या जागेत त्यांनी विनापरवाना अनधिकृत कंपाउंड/तारेचे कुंपण इत्यादींचा वापर करून सदरच्या जागेवर अतिक्रमण केले असल्याची तक्रार ग्रामस्तांनी केली होती. सदरच्या जागेवर केलेले अतिक्रमण 15 दिवसात हटविण्याबाबतची नोटीस संबंधितांना पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली होती. मात्र 15 दिवसांचा कालावधी उलटूनही हेलोंडे  यांनी सदर अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे महाराष्ट्र्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 50 अन्वये पाली सुधागड तहसीलदार यांनी आदेश देऊन प्रशासनामार्फत सदरचे अतिक्रमण निष्कशीत केले. 

अनेक वर्षांपासून विजयनगर ग्रामस्त अतिक्रमण हटविण्याबाबत शासनदरबारी पाठपुरावा करीत होते, मात्र कारवाईला जाणीवपूर्वक विलंब होत होता, मात्र जिल्हाधिकारी रायगड व पाली तहसीलदार यांनी कागदपत्र तपासून कारवाई करण्याबाबत आदेश  दिले, त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली आहे, या कृतिशील कारवाईने सत्याचा विजय झाला असल्याचे  धर्मेंद्र आंदेकर व ग्रामस्तांनी सांगितले.

सदर कारवाईचे श्री साईनाथ मित्रमंडळ विजयनगर पूरग्रस्त ग्रामस्थ धर्मेंद्र आंदेकर,गोपीनाथ खापरे, निलेश काळभोर, रोशन वालगुडे,सागर वालगुडे, राकेश करमरकर, विलास गलबले, मनोहर काळभोर, पांडुरंग वालगुडे, केशव वालगुडे, कविता काळभोर, गीतांजली खापरे, नम्रता काळभोर, सोनाली आंदेकर, रीना करमरकर, स्वरा काळभोर, शकुंतला काळभोर, अनिता शिंदे, गुलाब करमरकर, अनिता भेकरे आदी ग्रामस्त व महिलांनी स्वागत केले, व प्रशासनाचे आभार मानले.

विजयनगर ग्रामस्तांनी सरकारी गावठाण अंतर्गत असलेला रस्ता, खुली जागा व चावडी या जागेत असलेले कुंपण हटविण्याची मागणी केली होती. नगररचना विभागाच्या नकाशाच्या अनुषंगाने सदर रस्ता व जागा चावडीची असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे सदरचे अतिक्रमण व  कुंपण हटविण्याची कारवाई प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.

दिलीप रायन्नावार , तहसीलदार पाली सुधागड

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.