Press "Enter" to skip to content

नागोठण्यात भारत बंद चा फज्जा : सर्व दुकाने सुरु

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

कृषी कायद्या विरोधातील आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र शासनाचे कृषीविषयक धोरणास विरोध करण्यासाठी देशातील ४० शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या देशव्यापी बंदला नागोठण्यात कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.

जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी या बंदमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःहून, मोठ्या मनाने आपली दुकाने बंद ठेवली असतांनाच नागोठण्यात सर्व प्रकारची दुकाने, हाॅटेल्स सुरु असल्याचे दिसून आले.

शेतकरी वाचला तर देश वाचेल अशी सद्या चर्चा ऐकावयास मिळत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना न विचारताच कृषीविषयक कायदा मंजूर केला. मात्र यामध्ये भांडवालदारी लोकांचे फायदा आहे. शेतकऱ्याला आपली हक्काची जमीन वापरास बंदी राहील. अशी अनेक प्रकारची गुंतागुंत असलेला कायदा सरकारने मंजूर केलाच कसा. शेतकरी थेट आपला माल विकु शकेल असे जरी केंद्र सरकार सांगत असले तरी भविष्यात आपली जमिनीचा ताबा ज्या कंपन्या भांडवल पुरवणार आहेत त्या घेतल्याशिवाय राहणार नाहीत याची भीती शेतकऱ्याला आहे. म्हणूनच संपूर्ण देशात आज भारत बंदची हाक देण्यात आली होती.

या बंद साठी काँग्रेस, राष्ट्वादी काँग्रेस, शिवसेना, शेकापसह देशभरातील अनेक विरोधी पक्षांनी समर्थन दिले आहे. असे असतांनाच या “भारत बंद” साठी नागोठण्यातील कोणत्याही राजकीय पक्षाने व संघटनांनी पुढाकार न घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान यासंदर्भात नागोठणे व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिलशेठ काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भारत बंद चे आवाहन करण्यासाठी सकाळ पासून कुणीही आले नाही. त्यामुळे आमच्या व्यापारी असोसिएशन मधील सर्व प्रकारची दुकाने आज सुरु ठेवण्यात आल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.