Press "Enter" to skip to content

राष्ट्वादीचे जिल्हा सरचिटणीस परशुराम मोकल यांचा इशारा

जेएसडब्ल्यू प्रशासनाने मोफत पाणी देणे बंधनकारक अन्यथा आंदोलन

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

तत्कालीन निप्पाॅन डेन्रो इस्पात (आता जेएसडब्ल्यु) प्रशासनाने पाटणसई ते डोलवी पर्यंतच्या पट्ट्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींबरोबर एक करार करून जोपर्यंत कंपनी चालू आहे तोपर्यंत या पट्ट्यातील सर्व गावांना मोफत पाणीपुरवठा करण्याचे मान्य केलेले आहे. असे असतांनाच आता जेएसडब्ल्यू प्रशासन लोकांना पाणी देण्यास टाळाटाळ करत आहे. तसेच पाणी विकत देण्याची भाषा करीत आहे. हे आम्ही शेतकरी कदापि मान्य करणार नाहीत.

जेएसडब्ल्यू प्रशासनाने मोफत पाणी देणे आधीही बंधनकारक होते व आताही आहे. तसे न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडून जेएसडब्ल्यु प्रशासनाला चांगलाच धडा शिकवू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा सरचिटणीस परशुराम मोकल यांनी जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासनास दिला आहे.

याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना परशुराम मोकल यांनी सांगितले की, कासू विभागातील पाण्याच्या समस्येवर काही पक्ष राजकारण करीत आहेत. मोफत पाणीपुरवठा करण्याचे कंपनी प्रशासनाने मान्य केल्यानंतर शेतकर्‍यांनी कंपनीच्या जलवाहिनीला मोफत जागा देऊन कंपनीला संपुर्ण सहकार्य केले होते. कालांतराने सदरची लाईन जुनी झाल्यामूळे व मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदिकरणात ती येत असल्यामुळे कंपनी प्रशासनाने स्वतःसाठी नवीन ११०० मी.मी. व्यासाची मोठी जलवाहिनी टाकली आहे. या जलवाहिनी शेजारीच गावांसाठी दुसरी एक ४०० मी.मी. व्यासाची छोटी जलवाहिनी टाकली. या जलवाहिन्यांसाठी सुद्धा कंपनीने जागा विकत न घेता महामार्ग रुंदिकरणासाठी संपादित केलेल्या जागेतुनच सदरची नवीन जलवाहिनी टाकली आहे.

सदर नवीन जलवाहिनीचे काम पुर्ण होईपर्यंत कंपनी प्रशासन लोकांशी गोड बोलून जनतेची दिशाभूल करत होती. आता नवीन जलवाहिनीचे काम पुर्ण होऊन कंपनीला सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. मात्र गावांसाठी टाकलेली नवीन जलवाहिनी सुरु करण्यास जेएसडब्ल्यु प्रशासन वेगवेगळी कारणे देत टाळाटाळ करीत आहे. त्यातच जुनी जलवाहिनी महिन्यापूर्वी निडी गावाजवळच्या नदीत मोठ्या प्रमाणात फुटल्याने पाटणसई ते डोलवी पर्यंतच्या ४२ गावातील लोकांची गेल्या महिनाभरापासून पाण्यासाठी खुपच हाल होत आहेत. याची जेएसडब्ल्यू प्रशासनाला काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे.

आता कंपनी प्रशासनाने आपले ईप्सित साध्य झाल्यानंतर जनतेला वार्‍यावर सोडले आहे .आता कंपनी प्रशासन लोकांना पाणी देण्यास टाळाटाळ करीत आहे. कंपनी प्रशासनाला आपण दिलेल्या आश्वासनाचा विसर पडलेला आहे. आता जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासन जनतेला अनेक निर्बंध घालून पाणी विकत देण्याची भाषा करू लागली आहे. जनतेला हे मान्य नसून या भागातील शेतकर्‍यांनी पाईपलाईनला मोफत जागा उपलब्ध करुन दिली आहे .गेली अनेक वर्षे येथील जनता कंपनीचे प्रदुषण सहन करीत आहे.पण कंपनीने या भागातील जनतेचा विश्वासघात केला आहे.

दरम्यान या अन्याया विरुध्द रायगडचे खासदार सुनिल तटकरे व पालकमंत्री कु. आदितीताई तटकरे यांच्याकडे दाद मागणार असल्याचेही शेवटी परशुराम मोकल यांनी सांगितले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.