जेएसडब्लूच्या जलवाहिनीची दुरुस्ती तत्काळ करून पाणीपुरवठा सुरळीत करा
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
गेल्या अनेक दिवसांपासून नागोठण्याजवळील निडी येथील छोट्या नदीत मोठ्या प्रमाणात फुटलेल्या जेएसडब्लू कंपनीच्या जलवाहिनीची दुरुस्ती तत्काळ करून महामार्गालगतच्या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत करा असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जेएसडब्लूच्या व्यवस्थापनाला अलिबाग येथे झालेल्या बैठकीत दिले आहेत.
या जलवाहिनीची दुरुस्ती आता होणार असल्याने गेले महिनाभर पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या नागोठणेसह ४२ गावातील नागरिकांना विशेष करून महिलांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान गेले दहा वर्षे आम्ही सामाजिक भावनेतून आमच्या चप्पला झिजवून जेएसडब्लूकडून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी झटत असतांनाच कधीच कोणते श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु या जलवाहिनीबाबत काडीचाही अभ्यास नसल्यानेच ज्यांना अलिबाग येथे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत एक शब्दही बोलता आला नाही अशांनी या बैठकीचे श्रेय लाटण्याचा व लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नये. अशाप्रकारे फुकटचे श्रेय लाटणा-यांचा आम्ही जाहीर निषेध करतो अशी संतप्त प्रतिक्रिया पळस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व ४२ गाव जानहक्क समितीचे निमंत्रक हिराजी शिंदे यांनी व्यक्त केली.
अलिबागच्या बैठकीला उपस्थित असलेले हिराजी शिंदे यांनी जेएसडब्लूची जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन वस्तुस्थितीची माहिती देतांना सांगितले की, पाण्याचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने कोरोना काळातही जुलै महिन्यात पेण प्रांताधिकारी कार्यालयात आम्ही बैठक घेण्यास भाग पाडले होते. सध्या जलवाहिनी फुटल्याने त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक अलिबाग येथे घेण्यात आली.
या बैठकीत माहिती देतांना या जलवाहिनीचे सखोल अभ्यासक शिवरामभाऊ शिंदे यांनी सांगितले की, आता जेएसडब्लू असलेल्या पूर्वीच्या इस्पात कंपनीने केलेल्या कराराप्रमाणे के.टी. बंधाऱ्यातील पाणी जर कंपनीसाठी जाणार असेल तर सामाजिक बांधिलकी म्हणून हे पाणी पाटणसई ते डोलवी पर्यंतच्या ४२ गावांना देणे बंधनकारक असल्यानेच गेली २५ वर्षे हे पाणी गावांना पुरविण्यात येत आहे. जेएसडब्लूचे अधिकारी काही बाबतीत प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचेही यावेळी शिवरामभाऊ शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी वस्तुस्थिती लक्षात येताच मुख्याधिकाऱ्यांनी जेएसडब्लूच्या अधिकाऱ्यांना जलवाहिनीच्या दुरुस्तीचे आदेश दिले.
दरम्यान जेएसडब्लूची जलवाहिनी नदीत ज्या ठिकाणी फुटली आहे त्या ठिकाणी हिराजी शिंदे व कोंडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच निखिल मढवी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. भरतीचे पाणी आल्याने जलवाहिनीचे हे काम गुरुवारी सुरु होऊ शकले नाही. परंतु शुक्रवारी संबधितांकडून नदीच्या पत्राच्या वरील भागात बंधाऱ्याने पाणी अडवून जलवाहिनीच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच जलवाहिनी जर जास्त प्रमाणात फुटली असेल तर नदीच्या पात्रात तेवढ्या भागात मी केलेल्या सुचणे प्रमाणे नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याचेही हिराजी शिंदे यांनी सांगितले.








Be First to Comment