Press "Enter" to skip to content

जमिन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची शेतक-यांचा आक्रोश

रसायनीतील प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचा बीपीसीएल विरोधात निषेध मोर्चा

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्याशिवाय बी.पी.सी.एल कंपनीने कोणतेही काम करू नये असे ठरले असतानाही काही लोकांना हाताशी धरून बीपीसीएल कंपनीने कंपाउंडचे काम सुरू केल्याने रसायनीतील प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्यावतीने बी.पी.सी.एल कंपनीच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.यासाठी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन बिपिसिएल व्यवस्थापनाचा निषेध दर्शविला.

एप्रिल 2018 मध्ये शेतकरी प्रकल्पग्रस्त संघटनेने कंपनी गेटसमोर 19 दिवसाचे धरणे आंदोलन केले होते. या धरणे आंदोलनामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याशी बैठक घेऊन कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये शेतकऱ्यांच्या दहा मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली तरीही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्याशीही चर्चा झाली होती. या चर्चेला एच.ओ.सी व बी.पी.सी.एल कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी दि.बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील उपस्थित होते.

त्यावेळी असे ठरले होते की, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळात चर्चा होत नाही तोपर्यंत कंपनीने कोणतेही काम करू नये. असे ठरले असताना मुंबई उच्च न्यायालयाचा दावा प्रलंबित असतानाही बी.पी.सी.एल कंपनीने काही लोकांना हाताशी धरून कंपाउंडचे काम सुरू केले. याबद्दल प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मोर्चा काढून जाहीर निषेध केला.

यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी हातात फलक घेऊन "जमिन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची"अशी घोषणा देत बिपिसिएल विरोधात नाराजी व्यक्त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.