ग्रामपंचायतीने उपाययोजना करण्याची मागणी 🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔷🔶🔶
नागोठण्यातील के.टी. बंधा-यातून डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्लू कंपनीत जाणारी व खास महामार्गालगतच्या गावांसाठी असलेली जलवाहिनी निडी गावाच्या हद्दितील एका छोट्या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात फुटली आहे. या जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी जलवाहिनीचा पाणीपुरवठा पाच दिवसांपूर्वी बंद करण्यात आल्याने या जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या नागोठण्यासह सुमारे ४२ गावांतील नागरिकांना विशेष करुन महिलांना पाणी तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असून त्यांचे पाण्यासाठी हाल सुरु आहेत.
त्यातच जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवणार असल्याची नागरिकांना कल्पना नसल्याने त्यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
नागोठण्यातील काही भागांना जेएसडब्लू कंपनी कडून तर काही भागाला एमआयडीसी कडून पाणीपुरवठा केला जात असतो. एमआयडीसी कडून केला जाणारा पाणीपुरवठा नियमित चालू असतो परंतु जेएसडब्लू कंपनीकडून ज्या भागाला पाणीपुरवठा केला जातो त्या भागातील नागरिक अभागी असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. कारण जेएसडब्लू कंपनीकडून केला जाणारा पाणीपुरवठा नेहमीच विविध कारणांनी अनियमितच होत आहे.
पूर्वी संपूर्ण गावाला एमआयडीसी कडून पाणीपुरवठा केला जात होता तेव्हा सर्व अलबेल होते. मात्र जेएसडब्ल्युची जलवाहिनी सुरु झाल्यानंतर ग्रामपंचायतीने हळूहळू बहुतांशी भागातील एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद केला. सध्या तर नागोठण्यातील अर्ध्याहून अधिक भाग जेएसडब्ल्युच्यस जलवाहिनीवर अवलंबून आहे.
जेएसडब्लू कंपनीकडून ज्या भागात पाणीपुरवठा केला जातो त्या भागातील नागरिकांचे वारंवार हाल होत आहेत. महिला वर्गाला पायपीट करत विहिरीवरून पाणी भरून आणावे लागत आहे. नागोठणे ग्रामपंचायत प्रत्येक नळ जोडणी धारकाकडून पाणीपट्टी घेत असते. त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्या बाबत या भागातील नागरिकांसाठी योग्य ती उपाययोजना केलीच पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
नागोठणे ग्रामपंचायत जेएसडब्लू कंपनीच्या जीवावर किती दिवस पाण्याची तहान भागविणार आहेत. वास्तविक पाहता ग्रामपंचायतीने उर्वरित भागातही पूर्वी प्रमाणे एमआयडीसी कडून पाणीपुरवठा केला पाहिजे. अशीही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. पूर्वी एमआयडीसी कडून आलेले पाणी श्री शंकर मंदिर समोरील फळेबाव विहिरीत व गवळआळीतील विहिरीत सोडून तेथून पंपद्वारे नागोठण्यातील मोहल्ला, बौद्धवाडी, केएमजी विभाग, हायस्कूल, अंगारआळी, खडकआळी, बाजारपेठ, कचेरीशाळा, गुरवआळी आदी भागांना नियमित पाणीपुरवठा केला जात होता. परंतु काही इमारतीवाले व काही महाभाग मुख्य नळालाच पंप लावत असत. म्हणून पुढील भागाला कमी दाबाचा पाणीपुरवठा होत होता.
आताही जेव्हा जेव्हा जेएसडब्लू कंपनीचा पाणीपुरवठा सुरळीत होतो तेव्हाही असाच पंप लावण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या पंप लावून पाणी खेचून घेणाऱ्या महाभागांवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
पाणीपुरवठा बंद असतो तेव्हा नागरिकांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर आणावे लागतात. त्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसतो. मग नागरिकांनी पाणीपट्टी का भरावी ? आणि जेएसडब्ल्युचे हे पाणी तर मोफत आहे. तसेच पाणीटंचाई च्या काळात नागरिकांना पैसे खर्च करुन टँकर मागवावे लागतात. मग जेएसडब्ल्यु च्या या फुकटच्या पाण्याचे पाणी पट्टीचे बील नागरिकांनी का भरावे ? असा सवालही नागोठण्यातील नागरिक करीत आहेत.
यासंदर्भात नागोठण्याचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही ज्या ठिकाणी पाण्याची अडचण तेथे टँकर ने पाणीपुरवठा करत आहोत. आता पर्यंत आम्ही विविध भागाला १६ टँकर पाणीपुरवठा केला आहे. तसेच जेएसडब्लू कंपनीच्या पाणीपुरवठ्यावर आपण किती दिवस अवलंबून राहणार व कायम स्वरूपी काय उपाययोजना करणार या प्रश्नाला ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांनी बगल देत प्रतिक्रिया देण्याचे टाळले. दरम्यान पाण्याचा साठा करण्यासाठी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेएसडब्ल्युचा पाणीपुरवठा ५-६ तासांसाठी सुरु करण्यात आला होता. मात्र असे असले तरी हे पाणी किती दिवस पुरेल आणि जलवाहिनी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुटलेली आहे तेथे नदीच्या पात्रात जलवाहिनीच्या वर सुमारे पाच फूट पाणी असल्याने जलवाहिनी दुरूस्तीचे काम कधी होईल याबाबत कोणतीही शाश्वती नसल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.








Be First to Comment