नागोठण्यातील मुख्य रस्त्यालगतच्या टपऱ्यांच्या वाढीव शेडमुळे अपघातास निमंत्रण 🔶🔶🔶🔶
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔷🔷🔷
नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सरकारी दवाखाना या मुख्यरस्त्यालगतच्या टपरी धारकांनी काढलेल्या वाढीव शेड तसेच नामफलक पाट्या, टपरी समोरील मोठ-मोठे टेबल, भाजी विक्रेत्यांकडून सावलीसाठी मोठ-मोठ्या छत्र्या उभ्या करण्यात येत आहेत.
त्यामुळे दिवस-रात्रच्या रहदारीमुळे सदैव गजबजलेल्या या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. त्यातच या रस्त्यावरून जेव्हा एस. टी., ट्रक यासारखे मोठे वाहन जात असते त्यावेळी पादचारी व मोटारसायकल स्वारांचा अपघात होण्याची दाट शक्यता असल्यामुळे नागोठणे ग्रामपंचायतीने टपऱ्या धारकांनी काढलेले वाढीव शेड व इतर रहदारीस अढथळा येणाऱ्या काही बाबींबाबत टपरी धारकांना सुचना करून याबाबत योग्य ती मोहीम राबवावी. तसेच ग्रामपंचायतीने याबतीत लक्ष देऊन काही वर्षापूर्वी वाढीव शेड व रहदारीस अडथळा येणाऱ्या वस्तू ज्याप्रमाणे काढून टाकल्या होत्या तशाच प्रकारची कारवाई आत्ताही करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
नागोठण्यातील या मुख्य रस्त्यालगत एका बाजूला दुकानदार, टपरीधारक यांचे वाढीव शेड व दुसऱ्या बाजूला बसलेले भाजी विक्रेते, फळे विक्री करणारे हातगाडीवाले यांच्यामुळे या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना तर एस.टी. चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. टपरीधारकांचे वाढीव शेड व रस्त्याला चिकटूनच बसलेल्या या भाजी विक्रेत्यांच्या दुकानाला एस.टी. व इतर वाहनांचा थोडा जरी धक्का लागला तरी हा रस्ता जणू काय आपली खासगी मालमत्ता आहे असे समजून हे दुकानदार भांडणाचे प्रसंग निर्माण करीत आहेत.
त्यामुळे हा रस्ता वाहनांसाठी कायमचा बंद करुन या टपरी धारकांच्या व भाजी विक्रेत्यांच्याच ताब्यात देऊन त्यांना या रस्त्यावरच व्यवसाय करण्याची सवलत संबधितांनी द्यावी अशी संतप्त प्रतिक्रियाही नागरिकांतून उमटत आहे.

नागोठण्यातील महामार्गावरील पेण फाटा, मिरामोईद्दिन शाह बाबा दर्गा, शासकीय विश्राम गृह, शिवाजी चौक ते सरकारी दवाखाना पर्यंतचा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत जरी येत असला तरी या रस्त्यालगतच्या टपरी धारक, हातगाडीवाले व रस्त्यालगतच्या भाजी विक्रेत्यांकडून ग्रामपंचायत रोजच्या रोज रोख पावती फाडत असते. यातून ग्रामपंचायतीला आर्थिक उत्पन्नही मिळते. म्हणूनच या रस्त्यावर रहदारीस कारणीभूत ठरत असलेल्यांवर ग्रामपंचायतीने कारवाई करणे गरजेचे असताना ग्रामपंचायती कडून दुर्लक्ष का होत आहे ? असाही प्रश्नही ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावरून आपल्या स्कुटी वरुन जात असताना समोरुन एस. टी. आल्यामुळे आपला अपघात झाला असता परंतु काळजी घेतल्यामुळे मी वाचलो अशी माहिती नागोठण्यातील नागरिक, प्रियदर्शनी संस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सिराज पानसरे यांनी दिली. तसेच टपरी धारकांनी व भाजी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय जरूर करावा परंतु कुठलेही अतिक्रमण व दुस-याला त्रास होईल असे काम करू नये अशा सूचनाही यावेळी पानसरे यांनी केल्या आहेत.








Be First to Comment