मात्र, यावेळी प्रशासनाकडून अधिकृत घोषणा नाही 🔷🔷🔷🔷
सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔶🔶🔶🔶
तालुक्यात 18 एप्रिल 2020 रोजी पहिली कोरोना पॉझिटीव्ह पेशंट निष्पन्न झाल्यानंतर तब्बल सात महिन्यांच्या कालावधीमध्ये तालुक्यात 431 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. मात्र, गेल्या पाच दिवसांत या रूग्णसंख्येत वाढ झालेली नसल्याने पोलादपूर तालुका पुन्हा एकदा कोरानामुक्त झाला आहे.
यापूर्वी 15 जून 2020 रोजी पोलादपूर तालुका कोरोना मुक्त झाल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर अल्पावधीच पुन्हा नव्याने कोरोना संसर्ग झालेले पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून यावेळी कोणतीही अधिकृत घोषणा करण्याबाबत सतर्कता दाखविली जात नाही.
पोलादपूर शहरातील प्रभातनगर येथील एका महिलेला कोरोना झाल्याचा रिपोर्ट 18 एप्रिल 2020 रोजी आल्यानंतर केवळ 24 तासांतच तिचा कस्तुरबा हॉस्पिटलला दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना होऊन संपूर्ण तालुक्यामध्ये कोरोनाची दहशत पसरू लागली. याच महिलेचा पती 21 एप्रिल 2020 रोजी कोरोना पॉझिटीव्ह असल्याने मुंबईला फोर्टीज हॉस्पिटलला उपचारासाठी पाठविण्यात आले. यानंतर पळचिल येथील एक आणि कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील निवाची वाडी गावातील 2 रूग्णांची कोविड 19 टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर उमरठ फौजदारवाडी येथील एका रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. यांना अलिबाग येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. उमरठ येथील आणखी 3 जण कोविड 19 टेस्ट पॉझिटीव्ह दिसून आले. पाठोपाठ तुर्भे बुद्रुक येथील 2 जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. या रूग्णांवर महाड येथील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले.
चांभारगणी ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील निवे गावातील एका घरात आलेल्या 11 जणांपैकी 3 जणांना कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अन्य जणांचे स्वॅब पाठविल्यानंतर 1 जून 2020 रोजी 7 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. अशाप्रकारे निवे येथे 11 पैकी 10 जणांची कोविड 19 टेस्ट पॉझिटीव्ह आढळून आल्याने गांभिर्य अधिकच वाढले. यामुळे पोलादपूर तालुक्यातील कोविड 19 टेस्ट पॉझिटीव्ह असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या 21 वर पोहोचली. मात्र, शेवटच्या या 7 कोविड 19 टेस्ट पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसल्याने घरच्या घरी होम आयसोलेशन पध्दतीने उपचार करण्यात आले आणि त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्यानंतर सर्व कोरोनामुक्त असल्याचे 15 जून 2020 रोजी अधिकृतरित्या जाहिर करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच पोलादपूर तालुक्यात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढीस लागली आणि कोरोनामुक्तीच्या अधिकृत घोषणेवर पाणी पडले.
पोलादपूर तालुक्यात 18 एप्रिल 2020 रोजी पहिली कोरोना पॉझिटीव्ह पेशंट निष्पन्न झाल्यापासून आजतागायत 431 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 412 रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी जाऊन देण्यात आले आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर सद्यस्थितीमध्ये शून्य रुग्ण एक्टिव्ह असून शून्य नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, या काळामध्ये एकूण 19 कोरोना बळींची संख्या नोंदविण्यात आली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनवणे यांनी दिली आहे. यानंतर गेल्या सहा दिवसांमध्ये एकही नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. तरीदेखील, प्रशासनाने कोरोनामुक्त तालुक्याची अधिकृत घोषणा करण्यासंदर्भात सतर्कता दाखविली नाही.
यापूर्वी पोलादपूर तालुका कोरोना मुक्त झाल्याची घोषणा झाल्यानंतर अल्पावधीतच नवीन रुग्ण आढळून आले होते. पोलादपूर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच आशा सेविका यांनी नियोजनबध्द प्रयत्न करून गेल्या सहा महिन्यात कोरोना रुग्ण घरोघरी जाऊन शोधण्यापासून त्यांच्यावर उपचार करून घरी पाठविण्यापर्यंत विशेष मेहनत घेतली आहे. यामुळे पोलादपूर तालुका दुसऱ्यांदा कोरोना मुक्त झाल्याची परिस्थिती पाहण्यास मिळत आहे.








Be First to Comment