शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 🔶🔶🔶🔶
सिटी बेल लाइव्ह । अमोल नाईक । अलीबाग । 🔷🔷🔷🔷
केंद्रीय कृषी बिलाविरोधात शेकापक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.केंद्राच्या शेतकरी आणि कामगारविरोधी कायद्यांना विरोध करण्याचा निर्धार राज्यातील शेतकरी कामगार पक्षासह सर्व शेतकरी संघटनांनी घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या 26 नोव्हेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून या दिवशी पक्षाची ताकद दाखवित संपूर्ण अलिबाग लालेलाल करण्याचे आवाहन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.
शेकापक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा चिटणीस मंडळाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार पंडितशेट पाटील, माजी आमदार धैर्यशिल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, औरंगाबादचे जिल्हा चिटणीस काका शिंदे, जिल्हा परिषदेेचे अर्थ व बांधकाम सभापती अॅड निलीमा पाटील, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, माजी सभापती प्रमोद पाटील, महिला आघाडीच्या नेत्या नगरसेविका चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे अध्यक्ष नृपाल पाटील, अॅड. प्रसाद पाटील, राजिम बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्यासह सर्व तालुका चिटणीस, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा घाट रचला असून तो कदापी यशस्वी होऊ देता कामा नये यासाठी केंद्र सरकार विरोधात 26 नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या कायद्यातील तरतूदी अतिशय भयानक आहेत. सिलींग रद्द, शेतकरी असण्याची अट रद्द करण्यात आली आहे.
शेतकर्यांच्या पिकाला हमी भाव दिला जाणार नाही. महत्वाचा भाग असणारे कृषी उत्पन्न बाजार समित्याच रद्द करण्याचा घाट देखील केंद्राने घातला आहे. या प्रश्नांप्रमाणेच निसर्ग चक्रिवादळात झालेले नुकसान अजूनही भरुन देण्यात आलेले नाहीत. कित्येक नुकसानग्रस्त अद्यापि मदतीपासून वंचितच आहेत. झाड निहाय मदत देतानाही अतिशय अन्याय करण्यात आला आहे. कोरोनामुळे ओढवलेली भयंकर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आर्थीक मदत देण्याची गरज आहे.
छोटया मोठया उद्योगांना सरकारने मदत करण्याची गरज आहे. या काळात आलेले भरमसाठी विज बील पुर्णपणे माफ केलेच पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. अतिवृष्टीत उध्वस्त झालेल्या शेतकर्यांनाही पुरेशी नुकसानभरपाई दिलेली नसल्याकडेही आ. जयंत पाटील यांनी यावेळी लक्ष वेधले. योग्य पंचनामे करण्यात आलेले नाहीत. जिल्हयात आरोग्य सेवा योग्य नसल्याने अनेकांचे जिव जात असल्याने ही सेवा सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. रोहा तालुक्यातील प्रस्तावित औदयोगिक कारणांसाठी जमिन खरेदी बाबतही जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत स्थानिक भुमिपूत्रांना उध्वस्त करणार्या सरकारच्या धोरणाविरोधात शेकापक्ष ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही दिली.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी गावागावात बैठका घेऊन वातावरण निर्मिती करण्याचे आवाहन करुन प्रत्येक गाडीवर लाल बावटा फडकवत या मोर्चात सहभागी होण्याच्या सुचनाही यावेळी करण्यात आल्या.








Be First to Comment