आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर जमिनी परत करा, आक्रमक प्रकल्पग्रस्तांचा गगनभेदी नारा 🔷🔷🔷
लोकशासन आंदोलन समितीचे नेतृत्वात कडसुरे गेटसमोर प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन , कडेकोट पोलीस बंदोबस्त, 27 नोव्हेंबरला रिलायन्सचा फैसला 🔶🔶🔶
सिटी बेल लाइव्ह । पाली/रायगड । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷
आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर जमिनी परत करा असा गगनभेदी नारा देत पूर्वीची आयपीसीएल व आताची रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधात लोकशासन आंदोलन समितीचे लढाऊ नेतृत्व माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील , माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात सभोवतालच्या परिसरातील प्रमाणपत्र धारक प्रकल्पग्रस्त , नलिकाग्रस्त, स्थानिक भूमिपुत्र यांनी एल्गार पुकारला. दरम्यान रिलायन्स व्यवस्थापनाने याप्रश्नी बैठकीत सकारात्मक भूमिका स्पष्ट करीत येत्या 27 नोव्हेंबर ला मागण्यांच्या अनुषंगाने फैसला दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पंचक्रोशी मौजे नागोठणे ते चोळे येथील 36 वर्षांपासून अन्याय होत असल्याची भूमिका स्पष्ट करीत प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्तांनी शुक्रवारी ऐन दिवाळीत आंदोलनात्मक पावित्रा घेतला. व आंबेघर येथे प्रतिकात्मक पुतळ्याची रॅली काढली, तसेच कडसुरे मटेरियल गेटसमोर ठिय्या मांडला, यावेळी याठिकाणी मोठा पोलीस फौंजफाटा व दंगल नियंत्रक पथकाच्या तुकड्या बंदोबस्थासाठी आला होता. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांची जलद पूर्तता करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीत बंड पुकारण्यात आले असून या आंदोलनात एकजूट दिसून आली. यावेळी विविध मागण्या मांडण्यात आल्या. प्रमाणपत्र धारक प्रकल्प ग्रस्तांना कायमस्वरूपी कामावर घेण्यासाठी अंतिम तारीख निश्चित करून त्वरित देण्यात यावी, कंत्राटी कामगारांना लॉक डाऊन काळातील पगार व दिवाळी बोनस देण्यात यावा, कोरोना बाधीत कामगारांना विलगी करणं दरम्यानचा पगार व महिन्याचे रेशन द्यावे,समान काम समान वेतन कायदा अंतर्गत कामगारांना योग्य न्याय द्यावा, वारसांना कामावर घ्या, निवृत्ती वय 58 ऐवजी 60 वर्ष करा, 80 टक्के स्थानिकांना नोकरीत सामावून घ्या, बंद केलेले कंत्राटी कामगारांचे पास त्वरित चालू करा, बेकायदेशीर रित्या निलंबित केलेल्या कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घ्या, आदी मागण्या आंदोलन कर्त्यांनी केल्या. यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, कोण म्हणतो देणार नाय, घेतल्या शिवाय राहणार नाही, आदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून निघाला, आंदोलनात महिला, तरुण तरुणी, आबाल वृद्ध यांचा लक्षवेधी सहभाग दिसून आला. संविधानिक व लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनाने आज ना उद्या विजय निश्चित असल्याचा विश्वास आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी लोकशासन आंदोलन समितीचे मुख्य संघटक राजेंद्र गायकवाड ,गंगाराम मिनमीने, शशांक हिरे, उषा बडे, प्रमोदिनी कुथें, नीता बडे, गुलाब शेलार, सुरेश कोकाटे , मोहन पाटील, नारायण म्हात्रे, बळीराम बडे, चेतन जाधव आदींसह स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त, सुशिक्षित बरोजगार मोठ्या संख्येने उपस्तीत होते. दरम्यान यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

दरम्यान आंदोलनाच्या पाश्वभूमीवर पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, रिलायन्स व्यवस्थापनाच्या वतीने जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, तसेच लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने शशांक हिरे, गंगाराम मिनमीने, चेतन जाधव, सुरेश कोकाटे, प्रमोदिनी कुथे, गुलाब शेलार, उषा बडे, आदी शिष्टमंडळ यांच्यात रात्री उशिरापर्यंत महत्वपूर्ण बैठक झाली.
सर्व मागण्यांच्या अनुषंगाने व्यवस्थापन सकारात्मक व निर्णायक भूमिकेत आहे. येत्या 27 नोव्हेंबर रोजी योग्य तो निर्णय होणार असल्याचे रिलायन्स व्यवस्थापनाकडून जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी बैठकीत आश्वाशीत केले. त्यामुळे तूर्तास या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली.








Be First to Comment