Press "Enter" to skip to content

लोखंडी भुकटीच्या ओव्हरलोड वहातूमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका

रस्ता रोको करण्याचा किशोरभाई म्हात्रे यांचा इशारा 🔷🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । वाकण । महेश पवार । 🔶🔶🔶

लोखंडी भुकटीची वडखळ वरुन साळाव इस्पात कंपनीमध्ये व साळाव इस्पात कंपनीमधून वडखळ या ठिकाणी लोखंडी गोटीची ओव्हरलोड वहातूक होत असल्यामुळे रस्त्यांची अवस्था तर अधिक बिकट होत आहेच तसेच नागरिकांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे प्रशासनाने ही ओहरलोड वाहतूक त्वरित थांबवावी अन्यथा रस्ता रोखो आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना किशोरभाई म्हात्रे सांगतात की लोखंडी भुकटी वहातुक करतेवेळी ताडपत्रीच्या सहाय्याने बाधून नेण्याची अट आहे. लोखंडी भुकटीचा कच्चा माल वडखळ कडून साळाव येथील इस्पात कंपनीत नेला जातो. तो कच्चा माल इस्पात कंपनीत पक्का करुन त्याची लोखंडी गोटी तयार करुन पुन्हा वडखळ याठिकाणी नेला जातो. सदरची वहातुक करताना मर्यादित टन मालाचीच वाहतूक केली पाहिजे व वाहतूक करतेवेळी माल ताडपत्रीच्या साहाय्याने बांधून नेण्याची अट आहे. परंतु संबंधित ठेकेदार कुठल्याही अटीचे पालन न करता वाहतूक करत असतात.

हे वाहतूक करणारे वाहन चालक मोटारसायकल सारख्या छोटया वाहनांचा विचारही करीत नाहीत. म्हणून ही वहातूक करीत असताना अनेक अपघातही झाले आहेत. वरवठणे ते रोहा आमडोशी फाट्या पर्यंतचा रस्ता खराब झाला यास ही ओव्हरलोड वहातूकच कारणीभूत आहे. ही वाहतूक करणाऱ्या ब-याच वहानांवर ताडपत्री नसते. टायर झिजलेले असतात. बहुतांशी वाहने ही जुनी असल्यामुळे त्या वहानांचे कागदपत्रे व काही वाहन चालकांचीही तपासणी करणे आवश्यक आहे. वाहतूक करताना चालक वेगावर नियंत्रण ठेवत नसल्यामुळे वाहतुकी दरम्यान संबंधित रस्त्यावरून जाताना लहान वाहन चालक व पादचाऱ्यांना फार मोठी कसरत करावी लागते. ओहरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना किशोरभाई म्हात्रे यांनी सांगितले की, वाहतुकीच्या दरम्यान रस्त्यावर या भुकटीचे थर जमा होत असल्याने दुचाकी व सायकल चालवणे धोकादायक ठरत आहे. या ओहरलोड वाहतुकीमुळे भिसे खिंडीत अनेक ठिकाणी अपघातही झालेले आहेत. लोखंडी भुकटीच्या वाहतुकीमुळे सर्व प्रकारचे प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. या लोखंडी भुकटीच्या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे. आधीच कोरोनाची भीती त्यामध्ये ही लोखंडी भुकटी हवेत मिसळल्याने नागरिकांना आपल्या शरीरातील ऑक्सीजनची पातळी नियंत्रित राखणे अवघड जात आहे.

याबाबत प्रशासनाने संबंधित कंपनी व ठेकेदार यांना तंबी देऊन ओहरलोड वाहतुकीवर बंदी आणणे गरजेचे असल्याची मागणी भाजपचे माजी जिल्हाउपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.