Press "Enter" to skip to content

पोलिसांच्या मध्यस्थीने रास्तारोकोला स्थगिती, काम न झाल्यास पुन्हा जनआंदोलनाचा इशारा

सुधीर चेरकर यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने अलीबाग – रामराज – रोहा रस्त्याचे काम सुरु 🔷🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली/रायगड । धम्मशील सावंत । 🔶🔶🔶

अलिबाग,रामराज, रोहा या प्रवास वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या रस्त्याची आजघडीला भयावह अशी दुरावस्था झाली आहे. खड्डे , दगडगोटे, चिखल, माती खडी यामुळे मार्गावरून प्रवास करणे जीवघेणे व धोक्याचे झाले आहे. सदर रस्त्याची जलद सुधारणा होऊन जनतेचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा याकरिता वरंडे सरपंच सुधीर चेरकर यांच्या नेतृत्वात दि.(9)सोमवारी रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलनाची जय्यत तयारीही करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांनी रविवार दि. (8) रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांच्यासमवेत आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन यशस्वी मध्यस्ती केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बागुल यांनी दि. 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत रस्त्याचे जलद व दर्जेदार काम केले जाईल होईल असे लेखी आश्वासन दिले, त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी एकमताने दि.(9) रोजी होणारा रास्ता रोको तात्पुरता स्थगित केला. अलिबाग रामराज रोहा मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. 30 ते 35 वर्षाहुन अधिक काळ या मार्गावरून नागरिक व वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्याची दुरावस्था चव्हाट्यावर मांडली. या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना असह्य त्रास सोसावा लागत असून रुग्ण व गर्भवती महिलांचे अतोनात हाल होत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांना व्यवसाय , नोकरी , शिक्षण , कृषी , कोर्ट कचेरी आणि सरकारी कार्यालयातील कामे इत्यादिसाठी अलिबाग व रोहा या दोन्ही शहरांचा संबंध येतो , मुख्यत्वेकरून अलिबागला रोज अप – डाऊन करणा – या नागरिकांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे . या रस्त्यावरून दुचाकी , रिक्षा , चारचाकी खाजगी वाहनांबरोबर सरकारी वाहनांची वर्दळ खूप मोठ्याप्रमाणात आहे .

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना मान, मणका, कंबरडे मोडण्याबरोबरच शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतोय, तसेच वाहनचालकांच्या वाहनात मोठ्या प्रमाणावर बिघाड होऊन आर्थिक भुर्दंड बसत असल्याची जोरदार ओरड व तक्रारी सुरू झाल्या आहेत. सुमारे पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले .

त्या नंतर जेंव्हा जेंव्हा रस्ता खराब झाला तेंव्हा – तेंव्हा हितसंबंध जपणा – या कंत्राटदारांना रस्ता दुरुस्तीची कंत्राटे देऊन रस्त्याची थातूर – मातुर दुरुस्ती करण्याचे काम करण्यात येते . परंतु दुरुस्तीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असतात त्याचा परिणाम आज दिसून येत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे या मार्गाचे दर्जेदार डांबरीकरण व मजबुतीकरण व्हावे या मागणीसाठी सरपंच सुधीर चेरकर यांच्या नेतृत्वात जनआंदोलन छेडण्यात आले.दि. 9 नोव्हेंबर रोजी या मार्गावर व्यापक स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन घेऊन जनमानसाला होणारा त्रास व वेदना प्रशासन व सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी आंदोलनाला सर्वच स्थरातून जोरदार पाठिंबा मिळाला होता.

जनतेच्या उद्रेकापुढे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन नरमले व रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले. यावेळीं आंदोलनकर्ते सुधीर चेरकर यांनी रस्त्याच्या सुधारणेसाठी उभारलेल्या आंदोलनाला सर्वस्थरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला याबद्दल सर्वांचे आभार मानले, व आंदोलनाच्या यशात सर्वांचा महत्वपूर्ण वाटा असल्याची कबुली दिली. यावेळी राकेश पाटील म्हणाले की राजकारण विरहीत जन आंदोलनाचा धसका घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात केली, हे या आंदोलनाचे सर्वात मोठे यश आहे, अशातच रस्त्याचे काम दर्जेदार व टिकाऊ न झाल्यास येत्या काळात अधिक उग्र आंदोलन पुकारले जाईल असा इशारा पाटील यांनी दिला.

ऍड मधुकर वाजंत्री यांनी यावेळी खडसावून सांगितले की सदरच्या 26 किमी च्या रस्त्याच्या कामात कुठेही निकृष्ट दर्जाचे काम होत असलेले आढळल्यास तात्काळ काम थांबवून संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करू असा इशारा दिला. यावेळी पोलीस प्रशासनातील अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना आंदोलनकर्त्यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करायला लावून दुरावस्था दाखवून दिली.

यावेळी आंदोलनकर्ते सरपंच सुधीर चेरकर, ऍड राकेश पाटील, ऍड मधुकर वाजंत्री, प्रकाश गायकर, गिरीश तेलगे, प्रणित पाटील, सुधाकर शेळके, प्रकाश नथु भांजी, अरुण भगत,आदींसह ग्रामस्थ, प्रवाशी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी सभापती दिलीप भोईर यांनी उपस्थित राहून सुधीर चेरकर व आंदोलनाकर्त्यांचे अभिनंदन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.